Nashik Ramsetu Bridge : 1955 पासून आजतागायत नाशिककरांना जोडणारा रामसेतू शेवटच्या घटका मोजतोय, चार महापुराचा साक्षीदार!
Nashik Ramsetu Bridge : एकेकाळी नाशिक (Nashik) गोदावरीवरील रामसेतू (Ramsetu Bridge) पुलाचे काम अवघ्या एक लाख 10 हजार रूपयांमध्ये झालेले होते. आता रामसेतू पूल क्षीण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Nashik Ramsetu Bridge : गुलशनाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक (Nashik) गोदावरीवरील (Godavari) अनेक पुरांना पुरून उरणारा रामसेतू पूल आज मात्र शेवटच्या घटक मोजतांना दिसत आहे. एकेकाळी रामसेतूसह (Ramsetu Bridge) गाडगे महाराज पुलाचे काम अवघ्या एक लाख 10 हजार रूपयांमध्ये झालेले होते. त्यानंतर आता मात्र रामसेतू पूल क्षीण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा पूल सध्या नागरिक व रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदामाई दुथडी भरून वाहते आहे. शिवाय गंगापूर (Gangapur) मधून विसर्ग वाढविण्यात येत असल्याने पुन्हा परिस्थिती वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून रामसेतू पूल नागरिकांसाठी बंद करण्यात आला आहे. गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीला चार दिवसांपासून पूर परिस्थिती आहे. अशातच आता पुन्हा गंगापूर धरणाचा विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदामाईला पूर आलेला आहे. होळकर पुलाखालून देखील विसर्ग होत असल्याने रामसेतू पूल बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
दरम्यान नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) या ठिकाणी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. तसेच रहदारी आणि नागरिकांसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूनी बॅरिकेड लावण्यात आले आहेत. तसेच नदी काठी असणाऱ्या नागरिकांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुर परिस्थिती वाढण्याची शक्यता असून कुणीही नदी पात्रात उतरू नये किंवा सेल्फीचा मोह करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रामसेतूची दुरावस्था
दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांचा हक्काचा पूल असलेला रामसेतूने अनेक पूर पाहिले. साधारण 1955 च्या सुमारास या पुलाची निर्मिती झाली. त्यानंतर याच रामसेतूने 1969, 2008, 2016 आणि 2019 मध्ये आलेल्या महापूरांना लीलया पार केले आहे. मात्र सद्यस्थितीत रामसेतू पुलच रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यापूर्वीच रामसेतू तोडण्याच्या हचली सुरु झाल्या होत्या. मात्र नागरिकांना नदी पार करण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार असल्यामुळे प्रथम स्ट्रक्चर ऑडिट करून दुरुस्ती करायची की पूल पाडून नव्याने बांधकाम करायचे याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गोदावरीचे संवर्धक असलेले देवांग जानी म्हणाले, अनेक वर्षांपासून नाशिकरांना रामसेतूने साथ दिली आहे. मात्र सध्या पुलाची अवस्था बिकट झाली आहे. पुलाच्या अनेक भागात तडे गेले आहेत. 2019 सालच्या महापुरात देखील शहरातील अतिप्राचीन रामसेतू पूलाला मोठमोठे तडे गेले होते. या तड्यांमुळे रामसेतू पूल नागरिकांसाठी धोकादायक बनला होता. श्री गोदावरी नदीत सन 1969, 2008, 2016 आणि 2019 मध्ये आलेल्या महापूरांचे धक्के पचवलेला तसेच प्रती वर्षी येणाऱ्या पुराचे खास्ते खाल्लेला. रामसेतू पुल 67 वर्षे नाशिकरांना सर्व्हिस देणार रामसेतू आज स्वतः सर्व्हिस/ मेंटेनन्ससाठी रामभरोसे आहे. पुल दुरस्त करून नाशिककरांच्या जीवाशी खेळ थांबवा, असेही ते यावेळी म्हणाले.