Savitribai Phule: 2000 किलो रांगोळी, 31 तासांची मेहनत, 11 हजार स्क्वेअर फूटवर रांगोळी; सावित्रीमाईंना अनोखं अभिवादन
Nashik Savitribai Phule : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 11 स्क्वेअर फुटवरील रांगोळीचा ड्रोन व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Nashik Savitribai Phule: सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त सटाणा (Satana) जवळील मुंजवाड येथील शाळेच्या कलाशिक्षकाने शाळेच्या आवारात अकरा हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या (Rangoli) सहाय्याने सावित्रीबाई फुले यांचे चित्र रेखाटले आहे. आज सकाळपासून या रांगोळीचे ड्रोन व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सटाणा शहरानजीक असलेल्या मुंजवाड येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित जनता विद्यालयाने सावित्रीमाईंना अनोखे अभिवादन केले आहे. येथील महाविद्यालयाचे कला शिक्षक दिगंबर अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्त अनोखे अभिवादन केले आहे. तब्बल अकरा हजार स्केअर फुटाच्या आकाराची भव्यदिव्य आकर्षक रांगोळी साकारली असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. शिवाय ड्रोनच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या व्हिडिओला देखील तुफान प्रतिसाद मिळत आहे.
सावित्री आई फुले प्रतिमेचा रांगोळीच्या माध्यमातून विश्वविक्रम करण्याचा मानस ठेऊन 3 जानेवारी रोजी सावित्री आई फुले जयंती निमित्त महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालय मुंजवाड या विद्यालयात तब्बल 11 हजार स्क्वेअर फूट एवढी रांगोळी साकारण्यात आली आहे. यासाठी 2050 किलो इतक्या रांगोळीचा वापर केला गेला आहे. कला शिक्षक दिगंबर अहिरे व शाळेचे 30 विद्यार्थी, 8 शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले. एकूण 31 तासाच्या अथक परिश्रमातून हे शक्य झाल्याचे मुखयध्यापक एस .आर. जाधव यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष गोकुळ सहादु जाधव, सेक्रेटरी तुकाराम महादू सुर्यवंशी व संचालक मंडळ यांनी या अनोख्या अभिवादनाचे कौतुक केले. सदर रांगोळी जनता विद्यालय मुंजवाड येथे प्रेक्षकांना बघण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था मुंजवाड संचलित, जनता विद्यालय मुंजवाड येथील मुख्याध्यापकी व शिक्षकांनी कलाशिक्षक अहिरे यांना प्रोत्साहन देऊन रांगोळी काढण्यास सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनीस रांगोळी व कलर उपलब्ध करून दिले. अहिरे यांना विद्यालयातील विद्यार्थिनींनी व महिला शिक्षकांनी रांगोळी काढण्यास मदत केली. रांगोळी साकारण्यासाठी शाळेसमोरीलच जागेची अहिरे यांनी निवड केली. या ठिकाणी रांगोळी साकारण्यासाठी लागणाऱ्या आकारात बॅरीकेंटीग करून आतमध्ये रांगोळी साकारण्यात आली. यासाठी तब्बल 2050 किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. ही रांगोळी सलग 31 तास काम करत रांगोळी रेखाटली आहे.