(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Jayant Patil : गद्दार, खोके म्हटलं की झोंबतं, म्हणजे काही ना काही झालं असेल, जयंत पाटलांचे सूचक विधान
Nashik Jayant Patil : ते वाक्य कुणी उच्चारू नये, अशी व्यवस्था करण्याचे काम न्यायालयीन मार्गाने सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
Nashik Jayant Patil : गद्दार, खोके ही वाक्ये काही लोक स्वतःला लावून घेत आहेत, त्यामुळे आम्ही काय करणार, पण जर ही वाक्ये त्यांना झोंबत असतील आणि त्याअनुषंगाने जर कोर्टात जावं लागत असेल, तर याचा अर्थ काही ना काही झालं असेल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. त्याचबरोबर ते वाक्य कुणीच उच्चारू नये, अशी व्यवस्था करण्याचे काम न्यायालयीन मार्गाने सुरू असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून पक्ष बांधणीसाठी आणि आगामी निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर बूथ रचना, कार्यकर्त्यांची बैठक आदी बाबीसाठी ते नाशिकमध्ये आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. येत्या काही दिवसांत महाविकास आघाडी सभा आयोजित करण्यात आली असून अलीकडच्या सभांना जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे. ही सभा मोठी होणार असून महाराष्ट्रातील सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत. तर या सभेला शरद पवार उपस्थित राहणार की नाही, हे आम्ही आज उद्या ठरवू, असेही ते म्हणाले.
तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केलेल्या पंढरपूर सभेच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले कि, हा फार महत्वाचा विषय वाटत नाही. गर्दी कुणी, कुठे जमवली याला फार महत्त्व राहिलं नाही. तर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील म्हणाले होते कि, राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे, यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले कि, सुप्रीम कोर्टाच्या निकालात जर अपात्र झालं, तर या सरकारला राहता येणार नाही. आणि दुसरा पर्याय राहत नाही, त्या अनुषंगाने बोललो असल्याचे ते म्हणाले. गोपीचंद पडळकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले कि, ही अशी सगळी लोकं भारतीय जनता पक्षाने गोळा केली आहे. यातून भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. भाजपने राजकारणाचा स्तर कुठे नेऊन ठेवलाय, हे यातून दिसतं.
गद्दार, खोके ही वाक्य झोंबतात...
दरम्यान दिल्ली हायकोर्टाने उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांना हजर राहण्याचे आदेश दिले. यावर पाटील म्हणाले कि, गद्दार, खोकेही वाक्य काही लोकं स्वतःला लावून घेत आहे, त्याला आम्ही काय करणार? पण जर त्यांना हे झोंबत असेल, कोर्टात जावं लागत असेल, याचा अर्थ काही ना काही झालं असेल. ते वाक्य कुणीच उच्चारू नये, अशी व्यवस्था करण्याचे काम न्यायालयीन मार्गाने सुरू आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्या यासाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता आहे. तसेच सध्या राज्यात सावरकर वादावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कलह सुरु आहे. यावर जयंत पाटील म्हणाले कि, ते दोघे ठरवतील काय करायचे ते. त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर म्हणाले ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना भेटीसाठी वेळ देण्याचे आदेश दिले आहेत. सावळा गोंधळ या मंत्रीमंडळाचा आहे. हे मंत्री विधानसभेच्या सभागृहात देखील नसतात. ते लोकांना काय भेटणार? आता जनतेला भेटण्यासाठी प्रयत्न करण्याची वेळ सरकारवर आली असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर ते म्हणाले की, जनता हीच राम समजून जनतेची सेवा केली पाहिजे. सर्व मंत्रीमंडळ जाणं, हे प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला न रूचणारे आहे. आम्हीही राम भक्त आहोत. स्वतः एकटं जाऊन, काय पूजा करायची, ती करा..पण आता सत्ता आहे.सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही, हे कायम लक्षात ठेवायचं असतं, असा टोमणाही पाटील मुख्यमंत्र्यांना दिला.