(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हृदयद्रावक ! मित्रांना वाचवायला गेला अन् तोही बुडाला, इगतपुरीत तीन तरुणांचा मृत्यू
Nashik Igatpuri News : आज सुट्टीचा दिवस असल्याने तीन मित्र इगतपुरी शहरातील नगर परिषद तलावाजवळ फिरण्यासाठी गेले..
Nashik Igatpuri News : नाशिकच्या (Nashik) इगतपुरी दोन दिवसांपूर्वीच दोन भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दुर्दैवी घटना समोर आली आहे. इगतपुरी येथील नगरपरिषद तलावामध्ये (Igatpuri Nagarparishad) तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इगतपूरी (Igatpuri) शहरातील नगरपरिषद तलाव येथे फिरण्यासाठी तीन मित्र दुपारच्या सुमारास गेले होते. यावेळी दोघांनी अंघोळ करण्याचा निर्णय घेत तलावात उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडू लागले, या दोघांना बुडताना पाहून तिसरा त्यांच्या मदतीला गेला असता तो देखील बुडाला. दरम्यान त्यांना बाहेर काढण्यासाठी नगरपरिषद कर्मचारी जनसेवा प्रतिष्ठान व स्थानिक युवकांनी तलावात बचाव कार्य सुरू केले. काही तासानंतर बुडालेल्या तिघा युवकांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र उपचार सुरू असताना तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला झाला आहे. यातील एकजण इगतपुरी शहरात पाहुणा म्हणून आला होता, मात्र मित्राच्या सोबतीने फिरण्यासाठी आला आणि जीव गमावून बसला.
दरम्यान त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळालं. वेळेवर उपचार न मिळाल्याने या तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप यावेळी नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ देखील व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील देवळे परिसरातील नदीपात्रात मासेमारी करायला गेलेले दोघे सख्खे भाऊ पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दोघे बुडाल्यानंतर त्यांचा शोध सुरू होता. तब्बल तीन दिवसांनी त्यांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेला दोन दिवस उलटत नाही. तोच पुन्हा नवीन घटना इगतपुरी शहरातून समोर आली आहे. अद्याप मृत युवकांची नावे समजू शकलेली नाही.
इगतपुरी तालुक्यातील आवळखेड येथील राहणारे पंकज काशिनाथ पिंगळे, कृष्णा काशिनाथ पिंगळे हे दोघे सख्खे भाऊ देवळे गावाजवळील दारणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. दरम्यान यावेळी एक जण पाण्यात बुडत होता. भावाला पाण्यात बुडताना बघून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी धावला. मात्र दोघांचा नशीब जन्म मृत्यू अटळ होता. भावाला वाचवत काठावर आणीत असताना अचानक दोघेही बुडाले होते. त्यानंतर आज इगतपुरी शहरातील नगरपरिषद तलावात तिघेजण बुडाल्याने इगतपुरी शहर तसेच तालुक्यावर शोककळा पसरली आहे.