Nashik Nana Patole : नाशिकमध्ये पक्षासोबत फसवणूक, आता जास्त खोलवर जायचं नाही, नाना पटोलेंनी तांबे पिता-पुत्रांना सुनावलं
Nashik Nana Patole : नाशिकमध्ये पक्षासोबत फसवणूक झाली, आता जास्त खोलवर जायचं नाही, नाना पटोलेंनी तांबे पिता- पुत्रांना सुनावलं.
Nashik Nana Patole : पदवीधर निवडणुकीत नाशिकची (Nashik) जागा काँग्रेसची होती, यासाठी दोन कोरे एबी फॉर्म पाठवले असतांना पक्षाची फसवणूक करण्यात आली, तांबे कुटुंब हे स्वत: पुरतं की पक्षापुरतं हे स्पष्ट करायला लावू नका, असा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांना सुनावलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी तांबे कुटुंबीयांवर (Satyajeet Tambe) जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले कि, "काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी जो एबी फॉर्म पाठवला होता, तो कचऱ्याच्या पेटीत टाकला. त्याचे उत्तर का देत नाहीत. त्यामुळे या प्रकरणात जास्त खोलवर जायचं नाही, असा माझा सल्ला आहे. खोलवर गेलो तर फार अडचण होईल. तुमची विचारसरणी पक्षापुरती आहे की स्वतःपुरती? त्यामुळे त्याच्यापुढे जायचं नसून चर्चाही करायची नाही. यानुसार नाशिक पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे, त्याला निवडून आणणं आमचं कर्तव्य आहे."
नाशिक पदवीधर निवडणुकीवर नाना पटोले म्हणाले कि, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणणे हे आमचे दायित्व आहे. त्यामुळे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. जो पक्षाने आदेश दिला आहे तो जर मानला जात नसेल तर त्यावर कारवाई होईल. मी म्हणजे पार्टी नाही, त्यामुळे नाशिकला आलो म्हणजे मनधरणी करायला आलेलो नाही. पक्षाने उमेदवारी सुधीर तांबे यांना जाहीर केली होती, त्यानुसार कोरा एबी फॉर्म पाठवला होता. मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. मात्र तत्पूर्वी सुधीर तांबे हे उभे राहतील, हे सुरवातीला सांगितलं होतं. वडिलांना तिकीट मिळाले म्हणून मुलाने अपक्ष फॉर्म भरला. हा घरातला वाद आहे, काँग्रेस पक्षाचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांना हे आताच का सुचले?
आज 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात राज्यासाठी आपलं व्हिजन मांडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ठाकरे सरकारच्या काळात मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट त्यावेळचे सीपी संजय पांडे यांना दिलेलं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केला. त्यावर नाना पटोले म्हणाले की, फडणवीस यांना हे आताच का सुचले? आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून? हा निव्वळ मूळ मुद्द्यांवरुन जनतेचं लक्ष भरकटण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे पटोले म्हणाले.