Nashik Jindal Fire: जिंदाल कंपनीतील बेपत्ता कामगाराचा मृतदेह मिळाला, अद्यापही शोधमोहीम सुरूच
Nashik Jindal Fire : जिंदाल कंपनीतील आग प्रकरणात उत्तर प्रदेशातील कामगार सुधीर मिश्रा गायब होते.
Nashik Jindal Fire : जिंदाल कंपनीतील (Jindal Fire) आग प्रकरणात उत्तर प्रदेशातील कामगार सुधीर मिश्रा (sudhir Mishra) गायब होता. त्याचा दोन दिवसांपासून शोध सुरु होता. अखेर आज दुपारी शोध मोहीम सुरु असताना त्याचा मृतदेह आढळून आला आहे. तरीदेखील या दुर्घटनेत आणखी कामगारांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र प्रशासन माहिती लपवत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वाधिक रोजगार देणारा जिल्ह्यातल्या नावाजलेला प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या जिंदाल कंपनीत (Jindal Polyfilm) रविवारी गॅस गळतीनंतर भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आगही लागली या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी होते. मात्र यात एक कामगार बेपत्ता असल्याचे समोर आले होते. त्याचा दोन दिवसांपासून शोध घेतला जात होता, अखेर सुधीर मिश्रा नामक कामगाराचा मृतदेह आज दुपारच्या सुमारास आढळून आला आहे. तर अजूनही तब्बल 83 कामगार बेपत्ता असल्याची धक्कादायक आरोप कंपनी प्रशासनांवर करण्यात येत आहे. दरम्यान घटनेनंतर कंपनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितींनंतर घटनेच्या दिवशी 749 कामगार कामावर हजर होते. त्यापैकी 403 कामगार हे कंत्राटी कामगार होते. या सर्वांपैकी 724 कामगार हे आता सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क देखील झालेला आहे. रविवारच्या 19 कामगार हे जखमी होते, त्यातील दोन कामगारांचा मृत्यू झालेला आहे. तर सुधीर मिश्रा नामक कामगार जो उत्तर प्रदेशमधून काम करायला होता, तो मिसिंग असल्याचे त्याच्या भावाने सांगितले होते, मात्र आजच्या शोधमोहिमेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
इगतपुरी तालुक्यातील जिंदाल कंपनीतील काम करणारे सातशेहून अधिक कामगार घोटी (Ghoti) शहरात राहतात. त्यापैकी 83 कामगारांशी संपर्क होत नसल्याचे कुटुंबीय सांगत आहेत. त्यामुळे या कामगारांचा शोध घ्यावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या इगतपुरी तालुक्यातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांच्याकडे केली आहे. कंपनी प्रशासन कामगाराचा आकडा लपवत असल्याचे सांगून अद्यापही अनेक कामगार बेपत्ता असल्याची माहिती शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या जिंदाल कंपनी व्यवस्थापनाची कसून चौकशी करावी अशी मागणी यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तालुकाध्यक्ष संपतराव काळे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे.
कंपनी कामगार सुरक्षा वाऱ्यावर?
कंपन्यांना औद्योगिक सुरक्षा या नावाखाली जे गोंडस नाव दिले जाते, खरोखर त्याची अंमलबजावणी केली जाते का? हे बघणं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यालाच नव्हे तर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये इतर ज्या काही कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये अशा स्वरूपाची फायर सेफ्टीची काय अंमलबजावणी केली जाते? याबाबत लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. कंपनीमध्ये कर्मचारी वर्ग असतो, त्याची कमतरता प्रामुख्याने भासते आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत त्यांची संख्या वाढवणं हा एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे.