मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर; आमदार सुहास कांदेनी करुन दाखवलं, करंजवण पाणी प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन
CM Eknath Shinde Nashik Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे असून कालच पोहरादेवी गडावर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत होते. त्यांनतर आज ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड दौऱ्यावर येत आहेत.
CM Eknath Shinde Nashik Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज (13 फेब्रुवारी) नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून जिल्ह्यातील मनमाड येथील कार्यक्रमांना ते उपस्थिती दर्शवणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यभर दौरे असून कालच पोहरादेवी गडावर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत होते. त्यांनतर आज ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड दौऱ्यावर येत आहेत. येथील आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या पाणी प्रकल्पाच्या योजनेच्या भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. शहरातील भगवान ऋषीं वाल्मिकी स्टेडियमवर होणार्या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिंदे गटात जाणारे सुहास कांदे हे पहिले आमदार
सुहास कांदे नांदगाव मतदारसंघातील आमदार असून शिंदे गटात जाणारे पहिले नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष सख्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाशिक मनमाडला येत आहेत. येथील मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावणाऱ्या तब्बल 311 कोटीच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.
आमदार कांदेचे आश्वासन ठरले खरे
नाशिक जिल्ह्यात मालेगावनंतर मनमाड हे एकमेव मोठे शहर आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून शहरातील सव्वा लाख नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. दरम्यान 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांनी तुम्ही मला निवडून द्याल मी पाणीप्रश्न हमखास मार्गी लावेल, असे आश्वासन दिले होते. जनतेने त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या करंजवण पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेला शासनाने केवळ हिरवा कंदीलचं दिला नाही, तर त्यासाठी निधींची तरतूद देखील केली आहे.