Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक मध्य मतदारसंघाचं वातावरण तापलं, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच वसंत गितेंचा देवयानी फरांदेंवर गंभीर आरोप; म्हणाले...
Nashik Central Assembly Constituency : नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे वसंत गीते आणि महायुतीच्या देवयानी फरांदे यांच्यात थेट लढत होणार आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल अखेर वाजले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ (Nashik Central Assembly Constituency) राज्यभरात चर्चेत आला आहे. कारण नाशिक मध्य मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांचे नाव पहिल्या यादीत आले नाही. त्यानंतर देवयानी फरांदे यांनी मुंबई गाठत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अखेर भाजप उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
आज नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गिते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे माजी आमदार वसंत गीते आणि महायुतीच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी वसंत गिते यांनी देवयानी फरांदे यांच्या गंभीर आरोप केले आहेत.
नाशिकमधील ड्रग्ज आणि गुन्हेगारीला देवयानी फरांदे जबाबदार : वसंत गिते
वसंत गिते म्हणाले की, कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आपण आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. नाशिक भयमुक्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. तुम्ही डोळ्यासमोर पुणे, मुंबई, नागपूर आणले. मात्र तुम्ही नाशिकला काय दिले? नाशिकला दत्तक म्हणून घेतले, थोड्यावेळ गाडीत बसवले आणि सोडून दिले, ही नाशिकची परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांचे आमदार या शहरात भाई लोकांना सोबत घेऊन फिरत होते. ड्रग्जच्या बाबतीत जामीन करणे, चरस गांजा विकणारी मंडळी सोबत घेऊन फिरणे, आता जनताच त्यांचा बंदोबस्त करेल, असे म्हणत नाशिकमधील ड्रग्ज आणि गुन्हेगारीला देवयानी फरांदे जबाबदार असल्याची टीका वसंत गिते यांनी केली आहे.
देवयानी फरांदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
दरम्यान, नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार महायुतीच्या अधिकृत उमेदवार देवयानी फरांदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सलग दोन टर्म देवयानी फरांदे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आज महिलांनी औक्षण करत देवयानी फरांदे यांना शुभेच्छा दिल्यात. दहा वर्षात केलेल्या कामाची पावती मतदार देतील, असा विश्वास देवयानी फरांदे यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा