Nandgaon Assembly Constituency : समीर भुजबळांची माघार नाहीच, सुहास कांदेंना तगडं आव्हान, नांदगावमध्ये डमी उमेदवारही रिंगणात
Maharashtra Assembly Elections 2024 : अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी माघार घेण्यासाठी महायुतीतून जोरदार प्रयत्न केले जात होते. मात्र समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Assembly Elections 2024) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघातून (Nandgaon Assembly Constituency) माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. समीर भुजबळ यांनी माघार घेण्यासाठी महायुतीतून (Mahayuti) जोरदार प्रयत्न केले जात होते. मात्र समीर भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता नांदगाव विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजल्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. भयमुक्त नांदगाव अशी टॅगलाईन घेऊन निवडणूक लढवत असल्याची घोषणा समीर भुजबळ यांनी केली. यानंतर समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या. समीर भुजबळ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीच्या नेत्यांकडून त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले. मात्र समीर भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली नाही.
नांदगावमध्ये चौरंगी लढत
आता नांदगाव विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आज माघारीनंतर स्पष्ट झाले असून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे, शिवसेना ठाकरे गटाचे गणेश धात्रक, अपक्ष उमेदवार समीर भुजबळ, डॉ. रोहन बोरसे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या लढतीत डमी असलेले सुहास बाबुराव कांदे, गणेश काशिनाथ धात्रक यांचे देखील अर्ज कायम राहिल्याने या मतदारसंघात रंगत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, माजी खा. समीर भुजबळ यांना 'शिट्टी' चिन्ह मिळाल्याने त्यांनी भयमुक्त नांदगाव, प्रगत नांदगावसाठी आमची 'शिट्टी' जोरात वाजणार, असे म्हटले आहे.
चांदवडमध्ये तिरंगी लढत
दरम्यान, चांदवड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे बंधू केदा आहेर यांनी बंडखोरी केली. केदा आहेर यांनी निवडणुकीतून माघार घावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, केदा आहेर यांनी माघार घेतली नाही. केदा आहेर यांना रिक्षा चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे चांदवडमध्ये भाऊबंदकीत फाईट होणार आहे. केदा आहेर विरुद्ध राहुल आहेर विरुद्ध शिरीष कोतवाल अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
आणखी वाचा