आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे फेरबदल, विजय करंजकरांची उमदेवारी निश्चित?
Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून मोठे फेरबदल करण्यात आले आहे. विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Lok Sabha Election 2024 नाशिक : आगमी लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सध्या महायुती तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) मोठी खेळी खेळली गेली आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्हा प्रमुख विजय करंजकर (Vijay karanjkar) यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रमुखपदी तत्कालीन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची वर्णी लागली आहे. तर महानगरप्रमुखपदी विलास शिंदे (Vilas Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विजय करंजकरांना लोकसभेची उमदेवारी?
विजय करंजकर यांच्याकडे लोकसभा संघटक पद दिल्यामुळे लोकसभाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. विजय करंजकरांनी तरुण वयात शिवसेनेत प्रवेश केला. लहान कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख हा मोठा प्रवास त्यांनी केलेला आहे. नाशिकला दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून देण्यातही करंजकरांचा मोठा वाटा मानला जातो. विजय करंजकर यांचे नाव गेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या शर्यतीत होते. परंतु खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी मिळाल्याने करंजकरांचे नाव मागे पडले. भविष्यात न्याय देण्याचं आश्वासन करंजकरांना देण्यात आलं होतं. आता ठाकरे गटाकडून विजय करंजकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सुधाकर बडगुजरांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
नाशिक महापालिकेत ठेकेदारपासून ते शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवास विलक्षण राहिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. शिवसेना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली आहे. आता त्यांची ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये शिंदे गट- भाजपचे इच्छुक उमेदवारांमध्ये टोलेबाजी
शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) रावसाहेब दानवे यांना भेटण्यासाठी आले होते. दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी दानवेंचे स्वागत केले. त्यानंतर फोटो काढताना भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी माझ्या वाटेत येऊ नका, असा खोचक टोला विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना लगावला आणि आपल्या समोरून बाजूला काढले.
आणखी वाचा