(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनाला चटका लावणारी घटना! नाशिकमध्ये विजेच्या धक्क्याने बिबट्या अन् मोराचा अंत
Nashik News : पिंपळगाव बसवंत परिसरातील पानसरे वस्तीमध्ये बिबट्या आणि मोराचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिक : पावसाळा सुरु झाला की, विजेचा धक्का (Electric shock) लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते. आता बिबट्या (Leopard) आणि मोराला (Peacock) विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) परिसरातील पानसरे वस्तीमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.
विजेच्या धक्क्याने बिबट्या अन् मोराचा अंत
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत परिसरातील पानसरे वस्तीमध्ये (Pansare Vasti) मोराची शिकार करण्यासाठी बिबट्या मोरामागे धावत होता. यावेळी आपला जीव वाचविण्यासाठी मोर इकडे तिकडे पळू लागला. पळतापळता मोर विजेच्या डीपीवर जाऊन पोहोचला. त्यामागे बिबट्यानेही झेप घेतली. यानंतर दोघांनाही विजेचा जोरदार शॉक लागला. यात बिबट्या आणि मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत बिबट्या आणि मोराला वनविभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.
खेडलेझुंगे येथे विजेच्या धक्क्याने मोर मृत्युमुखी
गेल्या महिन्यातच खेडलेझुंगे (Khedlezunge) येथे विजेचा शॉक लागून मोराचा मृत्यू झाला. सुभाष घोटेकर आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांना दिलीप घोटेकर यांच्या शेतात रोहित्रावरील ट्रान्सफॉर्मरवर मोर मृतावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी रोहित्रावरून मोराचे शव खाली काढले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोराचे शव ताब्यात घेऊन निफाड येथील रोपवाटिकेमध्ये दहन केले.
ओणे येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार
दरम्यान, निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) ओणे गावातील प्रगतशील शेतकरी शरद शिवाजी हाळदे यांच्या वस्तीवर त्यांच्या गोठ्यातील गायीच्या वासरावर बिबट्याने शुक्रवारी मध्यरात्री हल्ला केला. दोन दिवस आधी त्यांच्याच वस्तीवरील पाळीव कुत्र्यावर देखील हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधी देखील या परिसरात अनेकदा बिबट्याने दर्शन दिले होते. भविष्यकाळात मानवी जीवनावर हल्ला होऊ नये यासाठी वनविभागाने या गोष्टीची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ओणे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Leopard News : विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना तुटला पिंजरा, अन् पुढे घडलं असं काही...