(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Loksabha : 'नाशिकमधून भुजबळ नव्हे तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार', शिवसेनेच्या दाव्याने महायुतीत पेच वाढणार!
Mahayuti Seat Sharing : नाशिकची उमेदवारी छगन भुजबळांना उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) महायुती (Mahayuti Seat Sharing) घमासान सुरूच आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार, असे बोलले जात आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उद्या नाशिकच्या जागेसाठी उमेदवारीची संकेत मिळत असतानाच नाशिकची जागा शिवसेनाचा लढवणार, असा दावा पुन्हा एकदा शिवसेनेकडून (Shiv Sena) करण्यात आला आहे.
नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हेमंत गोडसेच नाशिकचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा निर्माण झाला होता. भाजपची नाशिकमध्ये अधिक ताकद असल्याचे म्हणत नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून दावा ठोकण्यात आला. त्यानंतर दिल्लीवरून माझ्या नावाची चर्चा झाल्याचे सांगत छगन भुजबळांनी नाशिक लोकसभेसाठी शड्डू ठोकला. आता पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढा आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.
हेमंत गोडसेच निवडणूक लढवणार
नाशिकमधून भुजबळ नाही तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार, असा दावा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांनी केला आहे. उद्या भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या शक्यतेवर भाऊ चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत
भाऊसाहेब चौधरी म्हणाले की, भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत. नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार आहे. नाशिकची जागा पारंपारिक शिवसेनेचीच आहे. येत्या दोन दिवसात नाशिकच्या जागेवर निर्णय होईल. नाशिकच्या जागेचा निर्णय हा केंद्रात नाहीतर राज्यस्तरावर होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेत नाशिकमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार
बबनराव घोलप हे आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहेत. याबाबत भाऊसाहेब चौधरी यांना विचारले असता ते म्हणाले की, बबनराव घोलप यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे आणखी 10 ते 12 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या आठ दिवसात नाशिकमधून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत इनकमिंग होईल, असा दावाही भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे.
आणखी वाचा