मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
Nashik News : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
नाशिक : आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्यावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा मुलगा दीपक बडगुजर (Deepak Badgujar) विरोधात अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. या माजी नगरसेवकाने सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी त्यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आला होता. विजय गायकवाड या नावाने धमकीचा फोन आला असून या प्रकरणी संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश शहाणेंचा सुधाकर बडगुजरांवर आरोप
शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली : सुधाकर बडगुजर
याबाबत सुधाकर बडगुजर यांना विचारले असता ते म्हणाले की, मुकेश शहाणेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. महिला आघाडीने काल आंदोलन केलं होतं. मुकेश शहाणे यांना अटक करा, असे त्यात म्हटले होते. काल आंदोलन केले त्याची ही प्रतिक्रिया आहे. आंदोलनामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आज काहीतरी करायचे म्हणून आरोप केले आहेत. धमकी देणारा तो व्यक्तीच सांगेल की कोणी सांगितले. कोणी धमकी द्यायला सांगितले, याचा पोलीस तपास करतील. पोलिसांवर कालच्या मोर्च्याचे दडपण म्हणून हे सगळं सुरू आहे, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे.
आम्हाला टार्गेट कशासाठी करताय?
ते पुढे म्हणाले की, आमचं काय चुकलं, आम्ही पक्षनिष्ट राहिलो, पक्ष सोडला नाही. आम्हाला टार्गेट कशासाठी करत आहे? लोकसभेला जो प्रकार केला आता विधानसभेला तोच प्रकार केला जातोय. अंकुश शेवाळेचे व्यवहार आणि टॉवर लोकेशन बघायला पाहिजे होते. सिव्हिलचे रिपोर्ट कोर्टाला सबमिट व्हायचे बाकी असताना मुकेश शहानेला याबाबत कशी माहिती होती? मी सर्व अपडेट्स संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सांगितले आहेत. मंत्रालयातून ठराविक लोकांच्या सांगण्यावरून हे सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. सलीम कुत्ता सोबतचे व्हिडीओ व्हायरल करत आहे. सायबर क्राईमने यावर कारवाई करायला पाहिजे. आम्ही याबाबत तक्रार करणार आहोत. विधानसभा निवडणुकीत बडगुजर यांची भीती वाटत आहे म्हणून हे सर्व षड्यंत्र सुरु असल्याचे ही सुधाकर बडगुजर यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा