24 तासांनीही नाशकात शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरूच; विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच, गुलाल कोण उधळणार?
Nashik Teacher Constituency Election: नाशकात 24 तास उलटूनही मतमोजणी अद्याप सुरूच आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर आहेत.
Nashik Teacher Constituency Election: नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल आज लागणार आहे. गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर आहे. विजयासाठी दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5,100 मतं आवश्यक आहेत. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याची माहिती मिळत आहे. विजयी होण्यासाठी 31 हजार 576 मतांचा कोटा निश्चित आहे. शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडेंना पहिल्या पसंतीची 26 हजार 476 मतं मिळाली आहेत. दरम्यान, किशोर दराडे दुसऱ्या पसंतीच्या क्रमातही आघाडी टिकवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंना 17 हजार 372 मतं मिळाली आहेत. मविआ उमेदवार संदीप गुळवेंना 16 हजार 280 मतं मिळाली आहेत. अजित पवार पक्षाचे महेंद्र भावसार यांना अवघी 131 मतं मिळाली आहेत. तर आतापर्यंतच्या मतमोजणीत 1 हजार 702 शिक्षक
मतदारांची मतं बाद करण्यात आली आहेत. तर 63 हजार 151 मतं वैध ठरली आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे.
मतमोजणी प्रक्रियेत आढळल्या जास्त मतपत्रिका
मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.
मतमोजणी प्रक्रिया कशी?
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.