Nashik Forest : पर्यावरण दिनी वनकर्मचाऱ्याला धक्काबुक्की, सुरगाण्यातील प्रकार; तिघांवर गुन्हा दाखल
Nashik Forest : पर्यावरण दिनाच्या (World Enviroment Day) दिवशी झाडांची तोड करणाऱ्या नागरिकांना रोखणाऱ्या वन कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Nashik Forest : सुरगाणा (surgana), पेठ (Peth) तालुक्यात वनपरिक्षेत्रात खैराची, सागवन झाडांची तस्करी होण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. त्यातच स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. अशातच पर्यावरण दिनाच्या (World Enviroment Day) दिवशी झाडांची तोड करणाऱ्या नागरिकांना रोखणाऱ्या वन कर्मचाऱ्यास धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुरगाणा पोलिसांनी (Surgana Police) शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वनाच्छादित परिसर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आदी भागात वन तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेकदा वन कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करत सर्रास साग लाकडाची वाहतूक होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. दरम्यान सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रात वनकर्मचाऱ्यास धक्का बुक्की करण्यात आली आहे. पेट्रोल कटर घेऊन वृक्षांची कत्तल करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी जंगलात जाताना दोघा वृक्षतोड्यांना गस्तीवरील वनरक्षकाने रोखले. यावेळी दोघांनी वनरक्षकाची दुचाकी ढकलून देत धक्काबुक्की करून कटर जप्तीच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक पुर्व वनविभागातील अतिसंवदेनशील वनपरिक्षेत्रांपैकी एक असलेल्या उंबरठाण वनपरिक्षेत्रातील अवघड क्षेत्र बोरिपाडा येथील चाफावाडी बीटात फिर्यादी वनरक्षक नवनाथ चिंतामण बंगाळ हे नियमितपणे शासकिय गणवेश परिधान करून दुचाकीने गस्त करत होते. सोमवारी त्यांना दोघे स्थानिक इसम हे एका पोत्यात काहीतरी दडवून जंगलाकडे संशयास्पदरित्या जाताना आढळले. त्यांनी कर्तव्यानुसार त्यांना थांबण्याचा इशारा केला; मात्र संशयित कांतीलाल पांडू चौधरी, योगेश कांतीलाल चाैधरी व नितीन राऊत या तीघांनी जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंगाळ यांनीही दुचाकी उभी करून त्यांचा पाठलाग करत पकडले.
यावेळी त्यांच्याकडे पेट्रोलवर चालणारे झाड कापायचे कटर असल्याचे लक्षात आले. यामुळे वृक्षतोडीच्या इराद्याने हे संशयित जंगलात जात असल्याने बंगाळ यांनी त्यांच्याकडील यंत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला; मात्र तीघांनी त्यांना धक्काबुक्की करत जोरदार प्रतिकार करून यंत्र ताब्यात घेऊ दिले नाही आणि शिवीगाळ करत ‘तु पुन्हा जंगलात ये तुझा बेत पाहतो’ अशी धमकी देऊन पळ काढल्याचे बंगाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून सुरगाणा पोलिसांनी तीघा संशयितांसह त्यांच्या अज्ञात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक कोळी हे करीत आहेत.
मागील वर्षीही असाच प्रकार
दरम्यान असं म्हणतात कि, गुटखा बनविण्यासाठी खैर नावाच्या झाडांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे मात्र वनविभाग किंवा पोलीसांचं दुर्लक्ष आहे. रात्रीच्या वेळी स्थानिक नागरीकांना हाताशी धरून काही तस्कर सागवन, खैराच्या झाडांची तस्करी सर्रासपणे करत आहे. अनेकदा तस्करांना रोखण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांशी झटापट झालेली आहे. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा शिवारात खैराच्या झाडांची चोरटी वाहतुक करत तस्करीचा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघा वनरक्षकांवर संशयितांनी दगडफेक करत घातक हल्ला केला होता. या घटनेला वर्ष उलटत नाही तोच पुन्हा वनरक्षकाला धक्काबुक्की झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.