Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणाची ED चौकशी होणार, दमानियांकडे CDR कुठून आला याचा तपास करणार: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis On Ashok Kharat Case : अशोक खरातचा सीडीआर कुठून बाहेर आला, तो कसा मिळवला गेला याची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नाशिक : शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठी माहिती दिली आहे. या प्रकरणाची ईडीने दखल घेतली असून लवकरच ईडी चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच अंजली दमानिया यांच्याकडे खरात प्रकरणाचा सीडीआर कुठून आला याचाही तपास केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, "अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी एसआयटी तपास सुरू असून तो रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशी केली जाणार आहे."
CM On Ashok Kharat CDR : सीडीआर कुठून आला?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातचा सीडीआर जाहीर करून त्याला कोणत्या नेत्याचे किती कॉल आले याची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्याकडे हा सीडीआर कुठून आला असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कुणाला नाही. जे या प्रकरणाचा तपास करत आहेत अशा तपास यंत्रणांनाच तो सीडीआर मिळवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सीडीआर कसा बाहेर आला, तो कुठून मिळवला याची चौकशी केली जाणार आहे. अशोक खरात प्रकरणात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे."
दमानियांकडे खरातचा सीडीआर
अशोक खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सादर केलेल्या सीडीआरमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कथित सीडीआरमुळे अनेक व्हीआयपी नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय एवढी गुप्त माहिती बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे फडणवीसांच्या टार्गेटवर कोणीतरी आहे असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. दरम्यान, या कथित सीडीआरमुळे एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या सर्व नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत.
ही बातमी वाचा:
Before You Go
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र





















