Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
भारतीय बुद्धिबळपटू आणि ग्रँडमास्टर विदित गुजराती याने केंद्र सरकारकडून 'अर्जुन पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मागील १२ वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विदितने हा पुरस्कार म्हणजे खेळाडूच्या वर्षांनुवर्षांच्या मेहनतीला मिळालेले अधिकृत 'प्रमाण' आणि एक ओळख असल्याचे सांगितले.
आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना तो म्हणाला की, लहानपणीच्या खोडकर स्वभावामुळे वडिलांनी त्याला खेळाकडे वळवले. सुरुवातीला क्रिकेट खेळण्याची इच्छा होती; मात्र लहान वयामुळे बॅडमिंटन आणि बुद्धिबळ हे पर्याय मिळाले. घरात आधीपासून खेळल्या जाणाऱ्या बुद्धिबळाची त्याने निवड केली आणि हरण्याची भीती मागे टाकून जिंकण्याच्या ध्येयाने मेहनत सुरू ठेवली. या संपूर्ण यशात त्याच्या कुटुंंबीयांचा आणि प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
हा पुरस्कार जबाबदारी वाढवण्यासोबतच पुढे खेळण्यासाठी मोठे प्रोत्साहन देणारा आहे, असे मत त्याने व्यक्त केले. आगामी ऑलंपियाड स्पर्धेवर सध्या त्याचे पूर्ण लक्ष केंद्रित आहे. नवीन पिढीला सल्ला देताना तो म्हणाला की, बुद्धिबळ किंवा कोणत्याही क्रीडा क्षेत्रात करिअर करताना आवड आणि दीर्घकालीन मेहनत करण्याची तयारी असणे अत्यंत गरजेचे आहे. यश लगेच मिळत नसले तरी खेळातील सततची रुची आणि आवड खेळाडूला पुढे घेऊन जाते.




















