Devendra Fadnavis : 'पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे', देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
Devendra Fadnavis : आता कोणाच्याही पोटात दुखलं तर त्या पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आणले आहेत.
Devendra Fadnavis : सध्या राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. 'पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे', असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. ''गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या (Maharashtra) कानाकोपऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. मात्र या कार्यक्रमामुळे अनेकांच्या पोटात दुखत आहे. अनेकांची पोटदुखी वाटत आहे. कधी चांगलं काम केलं तरी काहींना पोटदुखी असते. मात्र या पोटदुखीवर औषध म्हणून डॉ. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणले आहेत. तरी फरक पडला नाहीतर आता अजित दादा (Ajit Pawar) आले आहेतच'', असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
'पोटदुखीवर रामबाण उपाय म्हणजे डॉ. एकनाथ शिंदे'
नाशिकमध्ये (Nashik) शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु असून या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ''आपण प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत आहोत. मात्र नाशिकमध्ये शासन रामदरबारी आले आहे. जे राज्य काम करते ते रामराज्य असते. त्यामुळे हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे की, ज्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आला आहात. कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) या सेवा तीर्थावर आपली सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. पण कधी कधी चांगलं काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. लोकांना लाभ दिला तरी लोकांच्या पोटात दुखत. पण आता चिंता करू नका, आता कोणाच्याही पोटात दुखलं तर त्या पोट दुखीवर औषध देण्याकरता डॉ. एकनाथ शिंदे आणले आहेत'', अशी मिश्किल टिपण्णी फडणवीस यांनी केली.
फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ''अजित दादा तुम्ही मागच्या कार्यक्रमात म्हणाले 'दोनच झेंडे दिसत आहेत, आता तिसरा झेंडा पण आला, काळजी करू नका. आपल्याला तीनही झेंडे घेऊन महाराष्ट्राचा झेंडा देशामध्ये सगळ्यात वर न्यायचा आहे. माझा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करून, तसं आपल्याला करून दाखवायचा आहे. एक वर्ष सरकारला पूर्ण झालं. पहिल्याच वर्षांमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारने करून दाखवलं. कारण जनतेचा विश्वास तर आहे, पण उद्योजक जगताचा विश्वास देखील आता महाराष्ट्रावर आहे. म्हणून आता उद्योगात आपण नंबर वन आहोत. शेतकऱ्यांच्या योजना सगळ्या मार्गावर लागल्या असून ही गती वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत'', असंही फडणवीस म्हणाले.
नाशिकच्या शेतकऱ्यांना बारा तास वीज
फडणवीसांनी पुढे सांगितलं की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दिवसा वीज द्या, 12 तास अखंडित वीज द्या, म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली. नाशिक जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा असून पुढच्या तीन वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला 12 तास दिवसाच वीज मिळेल, याची तजवीज झाली आहे. त्यातल्या 50 टक्के शेतकऱ्यांची तर वीज लवकर दिली जाणार आहे. यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत टेंडर देखील काढण्यात येणार आहे. याच वर्षी त्याचं काम सुरू करण्यात येईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिले. आम्ही प्रत्येक गावात अॅग्री बिझनेस सोसायटी बनवणार आहे. बिझनेस सोसायटीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. यात कोल्ड स्टोरेजची सोयदेखील असणार आहे. तसेच आमच्या योजनांमुळे महिलांनादेखील फायदा होत आहे. हे सरकार सामान्य माणसासाठी कटिबद्ध असून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या