Nashik News Update :  सरकारी यंत्रणांच्या दुरुपयोगवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच नाशिकमध्ये महापौरांसह भाजप शहराध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नमामी गोदा कार्यक्रमासाठी परवानगी घेतली नसल्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. तर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली जात असल्याचा भाजपने आरोप केला आहे. 
 
नाशिक महापालिकेच्या महापौरांची मुदत संपत असल्यामुळे विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सत्ताधारी भाजपाने लावला आहे. गोदा घाट सुशोभीकरण आणि गोदावरी प्रदूषण मुक्तिसाठी नमामी गंगाच्या धर्तीवर नमामी गोदा योजनेच्या कामाचे रविवारी भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याहस्ते हा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.


भूमिपूजनाचा सोहळा पार पडल्यानंतर मंत्र्यांची पाठ वळते न वळते तोच पोलिसांचा फौजफाटा गोदा काठावर जमा झाला. कार्यक्रमाचे आयोजक महापौर सतीश कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी पोलीस पुढे सरसावले. परंतु, त्यावेळी भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये वाद झाला.  त्यानंतर शहराध्यक्षांना अटक करून सोडून देण्याची प्रक्रिया पोलिसांनी पार पाडली. 


नमामी गोदा कार्यक्रमासाठी खुद्द  मनपा प्रशासनानेच परवानगी, ना हरकत दाखला दिला नसल्याचा पोलिसांनी दावा केला आहे. विनापरवानगी कार्यक्रम घेणे, लोकांची गर्दी जमा करणे, लाऊडस्पीकर लावणे आशा अनेक कारणामुळे महापौर, शहराध्यक्षांवर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती, सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी दिली आहे. 


"महापालिकेच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे महापौरांवरच गुन्हा दाखल झाल्याची पहिलीच वेळ असल्यामुळे पोलिसांच्या कारवाईचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना स्वतः फोन करून कार्यक्रमाचे पत्र दिले आहे. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करणं अनाकलनीय असून पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही सुरु असल्याचा आरोप, महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. 
 
दरम्यान, महापौर हे संविधानिक पद असताना देखील गुन्हा दाखल केल्यामुळे हा वाद आणखी वाढत जाण्याची शक्यता असून भाजप याबाबत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या