Russia Ukraine War : भारताच्या परराष्ट्र विभागाने युक्रेनमधील खारकिव्ह शहर सोडण्याच्या सूचना दिल्यानंतर हजारो विद्यार्थी पायपीट करत युक्रेनशेजारील पिसोचिन शहराकडे निघाले आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांना दीड दिवसात फक्त एक बाऊल सूप आणि एक ब्रेड मिळाला आहे. हे विद्यार्थी तब्बल 18 किलोमीटरची पायपीट करून दोन दिवसानंतर पिसोचिन शहरात पोहोचले आहेत. 


दोन दिवस 18 किलोमीटरची पायपीट करून भारतीय विद्यार्थी खारकिव्हमधून पिसोचिन शहरात पोहोचले आहेत. नागपूर येथील श्रेया लाडे ही विद्यार्थीनीही गेल्या दोन दिवसांपासून पिसोचीन शहरात अडकली आहे. तिच्यासोबत साडे तीनशे विद्यार्थी पिसोचीन मधील एका रुग्णालयाच्या इमारतीत आश्रयाला असल्याची माहिती श्रेयाचे वडील नरेश लाडे यांनी दिली आहे. 


खारकिव्ह शहर सोडल्यानंतर काल सकाळपासून या विद्यार्थ्यांनी एक बाऊल सूप आणि एक ब्रेड शिवाय काहीही खाल्लेलं नाही, अशी माहिती लाडे यांनी दिली आहे. खारकिव्ह शहरात सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी अडकले होते. परंतु, तीन दिवसांपूर्वी भारताच्या परराष्ट्र विभागाने सर्व भारतीयांना तातडीने खारकिव्ह शहर सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साधनाने खारकिव्ह सोडले. परंतु, हे विद्यार्थी आता पिसोचीनमध्ये अडकले आहेत. त्यांच्याकडे खाण्याची कोणतीही सोय नाही. त्यामुळे भारत सरकारने या विद्यार्थ्यांना पिसोचीन पासून जवळच असलेल्या रशियाच्या सीमेवरून रशियात आणावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. 


दरम्यान, युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत मारहाणीच्या घटना वाढल्या असून खारकिव्ह सोडताना भारतीय विद्यार्थ्यांना अनेक वाईट अनुभव आल्याचा लाडे यांनी दावा केला आहे. युक्रेनच्या नागरिकांनी भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये बसू दिले नाही. युक्रेनचे नागरिक भारतीय विद्यार्थ्यांना दमदाटी करत आहेत, असा दावा लाडे यांनी केला आहे. शिवाय एक हजार किलोमीटरच्या बस प्रवासासाठी बसमालक 15 हजार रुपये घेत असल्याने अनेक भारतीय विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे लाडे  यांनी म्हटले आहे. 


Ukraine Students : भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये प्रवेश मिळेना, खारकिव्ह सोडायचं तरी कसं? पाहा व्हिडीओ 



महत्वाच्या बातम्या