Russia-Ukraine War : युक्रेन-रशियाच्या (ukraine-Russia War) युद्धाचे परिणाम आता घराघरात जाणवू लागलेत.  स्वयंपाक घरातील तेलाच्या (kitchen oil) किमती 20 ते 25 रुपयांनी वाढल्यानं भाज्यांच्या फोडणीला भाववाढीचा तडका बसला असून किचन बजेट कोलमडू लागला आहे. युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास पुढील दीड ते दोन महिने लागतील असा अंदाज व्यक्त होतोय.


खाद्यतेल दरवाढीचा भडका
रशियाकडून सुरू असणाऱ्या बॉंम्ब वर्षावात युक्रेन होरपळून निघतोय. या दोन देशात सुरू असणाऱ्या युद्धाचे परिणाम आता संपूर्ण जगावर जाणवू लागलेत. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या नाशिकमध्ये खाद्य तेल दरवाढीचा भडका उडाला आहे. युक्रेनमधून मोठया प्रमाणात तेलाची आयात केली जाते. मात्र सध्या पुरवठा बंद झाल्यानं त्याचे थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होताना दिसत आहेत. एक लिटर तेलाचे भाव 20 ते 25 रुपयांनी वाढले आहेत, चार पाच दिवसात
सोयाबीन, सुर्यफुल तेलाचे भाव 140 वरून 160 ते 165 रुपयांवर गेलंय. येत्या काळात 180 ते 190 रुपयांच्या दरवाढीची शक्यता आहे. 


पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता


येत्या काही दिवसात युद्ध थांबले तरीही परिस्थिती सामान्य होण्यास त्यापुढे दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे, त्यातच देशात पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत असल्यानं तेला बरोबरच इतरही वस्तूंच्या दरवाढीला  तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे सरकार काय पावलं उचलणार? याकडं लक्ष लागलंय.


स्वयंपाक घरातील फोडणीला दरवाढीचा तडका


"दरवाढीमुळे  महिलांचे किचन बजेट कोलमडून गेलंय. तेलाचे भाव भडकल्यानं स्वयंपाक घरातील फोडणीला दरवाढीचा तडका बसला आहे. येत्या काळात दर वाढतील या भीतीने लोक आताच अधिकचे तेल खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे दुकानातील साठाही कमी झाल्याचे दिसत आहे." - दिव्या सापरिया, गृहिणी



"युद्धाच्या सावटामुळेच तेल दरवाढ झाली असे नाही तर गेल्या दीड दोन महिन्यांपासून  आंतरराष्ट्रीय व्यपारात घडलेल्या घडामोडींचा एकत्रीत परिणाम असल्याचं तज्ञाच मत आहे. इंडोनेशिया मलेशिया या दोन देशाकडून पाम तेलाची आयात केली जाते, इंडोनेशियाच्या एक्स्पोर्ट पॉलीसीमध्ये बदल झालेत त्याचा परिमाण आयातीवर झालाय, ब्राझील अर्जेंटिनामधून सोयाबीनची आयात केली जाते मात्र वातावरण बदलामुळे 35 टक्के सोयाबीनचे उत्पन्न कमी होणार असल्याने सोयाबीनच्या पुरवठ्यावरही परिणाम जाणतोय त्यामुळे सर्वच तेलांचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे" - प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष धान्य किराणा व्यपारी



"जगभरात चीन नंतर खाद्य तेलाचा वापर करणारा भारत दुसरा देश आहे, भारताच्या एकूण मागणी पैकी 65 टक्के खाद्य तेलाची आयात करावी लागते तर 35 टक्के तेल देशांतर्गत तयार केले जाते. एकट्या नाशिक शहरात दिवसाकाठी 100 टन तेलाची उलाढाल होते यावरून राज्य आणि देशाच्या तेल व्यपाराचा अंदाज येतो."- परेश बोधाणी, होलसेल व्यपारी 


कच्च्या तेलाच्या दराने सात वर्षातील उच्चांक मोडला


रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणावरही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दराने सात वर्षातील उच्चांक मोडला आहे. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 110 डॉलर इतके झाले आहेत. येत्या काही दिवसात कच्चे तेल आणखी महागणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे महागाईच्या संकटाची चाहूल लागली आहे


महत्त्वाच्या इतर बातम्या : 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha