(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Chhagan Bhujbal : 'आमच्या मनातील पंतप्रधान शरद पवार साहेबच', छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य
Nashik Chhagan Bhujbal : आज शरद पवार यांच्या एवढे काम करणारा कुणी दुसरा नेता नाही, असं मला वाटतं असं छगन भुजबळ म्हणाले.
Nashik Chhagan Bhujbal : कधी कधी राजकारणात काही गोष्टी जवळ येऊन हुलकावणी देतात. शरद पवार (Sharad Pawar) यांना पीएम पदापासून हुलकावणी मिळाली. पंतप्रधान पदाला (PM) योग्य आणि लायक असे शरद पवार आहेत. शरद पवार यांचा शेती, क्रीडा, बेरोजगारी आणि प्रशासन यांचा अभ्यास दांडगा असून मार्ग कसा काढावा, यावर ते मार्गदर्शन करू शकतात. आज त्यांच्या एवढे काम करणारा कुणी दुसरा नेता नाही, असं मला वाटतं. म्हणूनच आमच्या मनातील पंतप्रधान शरद पवार हे आहेत, अशी भावना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बोलून दाखवली.
आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, मोदी सरकार नऊ वर्ष पूर्ण झाल्याने अभियान राबवत आहे. मात्र निवडणूका जवळ आल्या आहेत. लोकसभा विधानसभेची (Loksabha) निवडणूक आली आहे. त्यामुळे आतापर्यतच्या काळात त्यांनी कुठली आश्वासनं पाळली आणि कुठे काय विकले, ते सांगितले पाहिजे. काम काय केलीत ते पण सांगा लोकांचा अभ्यास होईल. तसेच शरद पवार पंतप्रधान होऊ शकले असते, यावर ते म्हणाले की, शेती, क्रीडा, बेरोजगार आणि प्रशासन यांचा अभ्यास दांडगा असून आज त्यांच्या एवढे काम करणारा कुणी दुसरा नेता नाही, असं मला वाटतं. म्हणूनच आमच्या मनातील पंतप्रधान शरद पवार आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.
तसेच भुजबळ मंत्रीमंडळ विस्तारावर म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराचे आपण वर्षभर ऐकतो आहे. जाहिरातीच्या माध्यमातून कलगीतूरा रंगला आहे, ते करू नये. दुसऱ्या दिवशी परत जाहिरात द्यावी लागली. कोण करतंय याची कल्पना नाही. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुखावले जात आहेत. काम बाजूला राहतं असून फेव्हिकल हा खरा असला पाहिजे, नाहीतर कधीतरी तुटतातच, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. तसेच ते पुढे म्हणाले की, निवडणुका आल्या की जातीय द्वेष निर्माण होतो. कुठे यश मिळतं, कुठे नाही. मात्र निवडणुकांच्या वेळी आपापसात लाव्यालाव्या करतात. हिंदू मुस्लिम लोकांमध्ये काही अतिरेकी असून औरंगजेबाचे फोटो लावायचे काय काम होते. शिवाजी महाराज यांच्यासोबत अनेक मुस्लिम लोक होते, शिवाय महाराजांचा वकील मुस्लिम होता. त्यामुळे वातावरण दूषित करणाऱ्यांना आवरायला पाहिजे, असा सल्ला भुजबळांनी दिला.
माझा विश्वास बसत नव्हता....
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या करन्सी नोटप्रेस (Nashik Currency Press) मधील नोटांच्या बाबतीतील माहिती खळबळ उडविणारी आहे. यावर भुजबळ म्हणाले की, नोटा रिझर्व्ह बँकेत पोहचल्या नाही, याबाबत वर्तमानपत्रात वाचले, माझा विश्वास बसत नव्हता. प्रकरण खोटे असेल, तर जाहीर करुन टाकले पाहिजे. नाही सांगत असतील आणि तथ्य असेल, तर जाब विचारायला पाहिजे, असेही ते म्हणाले. अयोध्या पोळ प्रकरणावर ते म्हणाले की, थोडसं सयंमाने वागलं पाहिजे. कमी लेखण्याचा हेतू नाही. तसे कार्यकर्ते फोटो ठेवतात तसे हार घालतात. शाई फेक होऊ नये. महिलांच्या बाबतीत तर असे होऊ नये, असेही ते म्हणाले.
निधी वाटपसंदर्भात....
निधी वाटपसंदर्भात भुजबळ म्हणाले की, 100 रुपयांची सोय असेल, तर 150 रुपयांचे प्रपोझल तयार करायला सांगतो. काही प्रकरण बाद होतात, पण शंभर ऐवजी एक हजार रुपये मंजूर केले. कुणाही आमदाराला एक पैसा मिळणार नाही. नवीन कुठले काम होणार नाही. चौकशी झाले पाहिजे.. आम्ही यावर कोर्टात जाऊ, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. तसेच कांदा प्रश्नी तेलंगणा सरकारने चांगलं धोरण आखल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेक व्यापारी सध्या तेलंगणात कांदा विक्री करत असल्याचे समोर आले आहे. यावर भुजबळ म्हणाले की, लोकांना पैसे मिळत असतील, तर कांदा घ्या, जिथे पैसे मिळतील, तिथे व्यापारी कांदा पाठवतात. शिवाय पक्षाचा अजेंडा काय हे पण पाहिले पाहिजे. हा भूलभूलभय्या नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.