Nashik Election 2026: नाशिकमध्ये भाजपचा ठाकरेंना मोठा झटका, दोन बड्या नेत्यांना गळाला लावलं, गिरीश महाजनांचं ऑपरेशन लोटस
Nashik Election 2026: नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक: राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षांतर होताना दिसत आहे, अशातच नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले असल्याची माहिती समोर आली आहे. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ हे दोन्ही नेते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
तर काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या नेत्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) दिग्गज नेते आहेत. तर शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला (Shivsena UBT)हा धक्का मानला जात आहे.
Nashik Election 2026: मनसे-शिवसेना युतीवेळी जल्लोष केला अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी, ता २४) मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या पक्षाची युतीची घोषणा होत असताना जल्लोषात सामील झालेला नेता आता भाजपात जाणार या चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात रंगल्या. नाशिकचे दोन माजी महापौर आणि शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले विनायक पांडे यांच्यासह यतिन वाघ हे भाजपच्या गळाला लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असून, यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे संकटमोचक मानले जाणारे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विनायक पांडे हे ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू आणि आक्रमक नेते म्हणून ओळखले जात होते. बुधवारी सकाळी ठाकरे गट-मनसे युतीची घोषणा झाल्यानंतर जल्लोषात सहभागी झालेले पांडे थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्यांच्यासोबतच यतिन वाघ हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत.
दुसरीकडे, काँग्रेसचे नाशिकमधील बडे नाव असलेले शाहू खैरे भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. खैरे यांच्यासारखा अनुभवी चेहरा भाजपमध्ये गेल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद शहरात अधिक वाढणार असल्याचं बोललं जात आहे. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात गिरीश महाजन यांची मजबूत प्रभाव आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे तीन बडे नेते भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. एकाच वेळी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचून भाजपने महाविकास आघाडीला नाशिकमध्ये मोठा धक्का दिल्याच्या चर्चा आहेत.























