Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान मंडळावर विश्वस्त व्हायचंय? काय आहे पात्रता, असा करा अर्ज
Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये चार भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Trimbakeshwer Mandir : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचा कालावधी 3 जुलै,2023 रोजी संपुष्टात येत असून विश्वस्त मंडळामध्ये 4 भाविक प्रतिनिधी विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषगांने इच्छुक, योग्य व पात्र व्यक्तिंनी नेमणुकीकरिता विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिर (Trimbakeshwer Mandir) ट्रस्टवरील विश्वस्त मंडळाची मुदत 4 जुलैला संपणार असल्याने ट्रस्टवर नवीन विश्वस्त धर्मदाय आयुक्तांकडून निवडले जाणार आहेत. सहधर्मदाय आयुक्त यांनी याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. या नोटिशीनुसार इच्छुकांना अर्ज करण्यासाठी 30 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. चार भाविक प्रतिनिधी विश्वस्त मंडळावर निवड करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. आलेल्या अर्जांमधून धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून विश्वस्तांच्या मुलाखतीनंतर निवड केली जाणार आहे. अर्ज भरण्यासाठीचा विहित नमुना, त्यासाठी जोडावयाच्या कागदपत्रांची यादी धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच नमुना न्यासाच्या फलकावर अर्थात उत्तर महादरवाजा प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
विश्वस्त मंडळाची रचना कशी असते?
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मंडळावर अध्यक्ष, सचिव यांच्यासह नऊ विश्वस्त कार्यरत असतात. यात जिल्हा न्यायाधीश हे अध्यक्ष असतात तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिव असतात. असे दोन पद सिद्ध असतात. भाविकांमधून निवडलेले चार विश्वस्त मंडळावर असतात. पुरोहित संघ एक, तुंगार ट्रस्ट मंडळ एक आणि मंदिरातील त्रिकाल पुजाकांचा (ट्रस्टचे घटक) एक असे तीन प्रतिनिधी संबंधितवरील तीन यंत्रणांकडील असतात. ट्रस्टच्या घटनेत तसे नियोजन आहे. शक्यतो या तीन साठीचा ठराव संबंधितांकडून घेतला जातो. भाविकांमधून निवडलेले चार असे नऊचे विश्वस्त मंडळ कार्यरत असते. धर्मादाय आयुक्तांकडून सध्याच्या घडीला काढण्यात आलेली नोटीस फक्त भाविकांमधून निवडायच्या चार विश्वस्त निवडीसाठी आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता काय?
अर्ज करताना रहिवासी दाखला, आधार कार्ड, अर्जदाराची स्थावर मालमत्ता, उत्पन्न दाखला, पोलीस खात्याकडून चरित्र प्रमाणपत्र आदींची माहिती अर्जात द्यावी लागणार असून कागदपत्रे जोडवी लागणार आहे. विश्वस्त मंडळाची मुदत पंचवार्षिक असते. दरम्यान आता 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने विश्वस्त पदासाठी इच्छुकांची संख्या वाढणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन साधूंचा एक प्रतिनिधी मंडळावर घ्यावा, अशी मागणी साधू महंतांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
