शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ
Anil Deshmukh : शरद पवार नाशिकमध्ये मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये सुनील तटकरे येऊन गेले, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक : दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) निवडणुकीसाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. काल (दि. 16) मनमाड येथील सभा आटोपून शरद पवार आणि जयंत पाटील (Jayant Patil) हे नाशिकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामासाठी दाखल झाले. शरद पवार मुक्कामी असलेल्या हॉटेलला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी भेट दिल्याचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अजित पवार नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबतही अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केले आहे. चार जूननंतर महायुतीतील अनेक नेते नाराज असतील. मात्र जे पक्षाला सोडून गेले त्यांना परत घ्यायचं नाही हे पवार साहेबांनी सांगितलं आहे, असे त्यांनी म्हटले.
अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ
शरद पवार ज्या हॉटेलला मुक्कामी होते. ते हॉटेलला सुनील तटकरे येऊन गेले, असे मला कळले. माझी भेट झाली नाही. मात्र आमचे काही कार्यकर्ते त्यांना भेटले, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणीही संपर्कात आला तरी आम्ही कोणालाही परत घेणार नाही, असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासण्याचे मुद्दाम नाटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये येताना बॅगेत पैसे आणल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. काल मुख्यमंत्री पुन्हा नाशिकमध्ये आले असता त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नाही. यावर अनिल देशमुख म्हणाले की, आधी आलेल्या बॅगांवर संशय होता म्हणून यावेळी चौकशीचा फार्स केला. बॅगा तपासण्याचे नाटक मुद्दाम केले. मुख्यमंत्र्यांनी केवळ देखावा केला, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
मोदी जितक्या सभा घेतील तितका मविआला फायदा
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही. सिंचन घोटाळ्यावर मोदींनी वक्तव्य केल्यानंतर अजित दादांची (Ajit Pawar) धावपळ झाली. आज देशात 200 जागा पार सुद्धा महायुती जिंकणार नाही. नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) जितक्या जास्त सभा होतील तितका आम्हाला फायदा होणार आहे. मोदींनी जास्त सभा घ्यावात जेणेकरून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फायदा होईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
अनिल देशमुखांचा दावा जयंत पाटलांनी फेटाळला
दरम्यान, अनिल देशमुख यांचा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र फेटाळला आहे. मी आणि शरद पवार एकाच हॉटेलला नाशिकमध्ये मुक्कामाला होतो. मात्र, तटकरे यांची भेट झाली नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी एबीपी माझाला दिली आहे. काही वेळापूर्वीच सुनील तटकरे नाशिकहून पालघरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सायंकाळच्या मुंबईतल्या महायुतीच्या सभेसाठी देखील ते उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा
Jayant Patil: छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा, तुमच्याशी संपर्क केला का? जयंत पाटील म्हणाले...