Nashik Leopard :एकाचा अपघात, दुसरा आजारी अन् तिसऱ्याचा साथीदारासोबतच्या झुंजीत मृत्यू; नाशकात एकाच दिवशी तीन बिबट्यांच्या मृत्यूनं हळहळ
Nashik Leopard : एकाच दिवशी नाशिक जिल्ह्यातील वेगवगेळ्या घटनांत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Leopard : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात बिबट हल्ल्याच्या घटना घडत असताना दुसरीकडे बिबट मृत्यूच्या (Leopard Death) घटनांमध्येही वाढ झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी उन्हामुळे दोन्ही माय लेकरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच एकाच दिवशी जिल्ह्यातील वेगवगेळ्या घटनांत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त हाेत आहे.
बिबट्या आणि नाशिक शहर (Leopard) आणि जिल्हा हे जणू समीकरण बनले आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग तळ ठोकून आहे तर दुसरीकडे बिबट्यांच्या अपघाताच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी बागलाण (Baglan) तालुक्यातील तांदुळवाडी येथे एकाच वेळी एकाच ठिकाणी मादी बिबट्या आणि तिच्या एक वर्षांच्या बछड्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तर काल एकाच दिवशी तीन घटनांत तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. माेठ्या बिबट्याने छाेट्या बछड्यावर चढविलेल्या हल्ल्यात बछडा ठार झाला. तर महामार्गावर वाहनाच्या धडकेतही एका बिबट्याचा मृत्यू झाला. या दाेन घटना घडल्या असताना एक महिन्यांपूर्वी मरणासन्न अवस्थेत ताब्यात घेतलेल्या बिबट्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान 15 एप्रिल रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास विल्हाेळीजवळील (Vilholi) राजूरबहुला येथील मुंबई आग्रा- महामार्गावरुन पाच ते सहा वर्षांचा नर बिबट्या रस्ता ओलांडत हाेता. त्याचवेळी भरधाव वेगातील वाहनचालकाने बिबट्यास समाेरुन धडक दिली. त्यात ताेंडाला आणि पाेटाला जबर मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव हाेऊन बिबट्या ठार झाला. वनखात्याला ही माहिती कळविण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणेसह रेस्क्यू पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत कार्यवाही केली. बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी वनगुन्हा दाखल झाला असून संशयित चालकाचा शाेध वनखात्याने सुरु केला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज आणि अपघाताची वेळ पडताळून तपास केला जात आहे.
दरम्यान, त्र्यंबक राेडवरील बेळगाव ढगा येथे बिबट्यांच्या झुंझीत चार महिन्यांची बिबट मादी ठार झाली. येथील तानाजी मोंडे यांच्या मालकी गट नंबर 13/अ येथे दाेन बिबट्यांत झुंज झाली. आपले वर्चस्व टिकविण्यासाठी प्राैढ नर बिबट्याने चार महिन्यांच्या मादी बिबट्याच्या गळ्याचा चावा घेतला. गंभीर जखमेमुळे ही मादी मरण पावली. वनखात्याने मृतदेहाचा पंचनामा केला असता तिच्या गळ्यावर माेठ्या बिबट्याने चावा घेतल्याचे दिसून आले. राेजी घडलेल्या या तिन्ही घटनांमुळे तालुक्यासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त हाेत आहे. दरम्यान, बिबट्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकाचा शाेध वनखात्याने सुरु केला आहे. त्यासाठी तांत्रिक मदतही घेतली जाणार आहे.
उपचारादरम्यान मादीचाही मृत्यू
एक महिन्यांपूर्वी मरणासन्न अवस्थेत सापडलेल्या दीड वर्षीय बिबट मादीला वनविभागाने रेस्क्यू केले हाेते. संगमनेर उपवन विभागाने अत्यवस्था अवस्थेत मादी बिबट्याला रेसू करून मागील महिन्यात नाशिक येथील पश्चिम वनविभागाच्या त्यातील चालवल्या जाणाऱ्या तात्पुरत्या वन्य प्राणी उपचार केंद्र दाखल करण्यात आले होते. या बिबट्याला अपस्मारचा आजार झाला होता पुण्याच्या रेस्क्यू संस्थेच्या चार डॉक्टरांकडून उपचार केले जात होते मात्र महिनाभरापासून सुरू असलेली बिबट्याची मृत्यूची झुंज अखेर शनिवारी अपयशी ठरली. तिच्यावर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून वनखात्याला मृत्यूच्या कारणांचा अहवाल दिला आहे. त्यानंतर वनखात्याने या मादीचे सरण रचून अंत्यसंस्कार केले.