Nashik Peth Highway : पेठ टोलनाका वादात! मासिक सवलत, टोल माफी गेली कुठं? शेतकऱ्यांचा मंत्री पवारांना प्रश्न
Nashik Peth Highway : नाशिक- पेठ (Nashik-Peth Highway) रस्त्यावर चाचडगाव शिवारात उभारलेल्या टोलबाबत (Chachdgaon Toll) परिसरातील शेतकऱ्यांनी आवाज उठविला आहे.
Nashik Peth Highway : नाशिक-पेठ रस्त्यावर (Nashik Peth Highway) उभारण्यात आलेल्या टोलवर आम्हाला सूट द्यावी, अन्यथा हा टोल बंद करण्यात यावा, हा टोल अवजड वाहनांसाठी उभारला असताना आमच्यासारख्या शेतकऱ्यांकडून टोल कशाला वसूल करता असा सवाल चाचडगाव टोल (Chachdgaon Toll) परिसरातील शेतकऱ्यांसह वाहनधारकांनी केली आहे.
नाशिक (Nashik) -पेठ या राष्ट्रीय महामार्ग क्र.848 वर चाचडगाव नजीक काही दिवसांपूर्वी टोल उभारण्यात आलेला असून जून महिन्यापासून हा टोल प्लाझा सुरू करण्यात आला आहे. तत्पूर्वी नाशिक-पेठ या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था होती. त्यामुळे नाशिक पेठ मार्गे गुजरातला (Gujrat) जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने वेळोवेळी या रस्त्याबाबत नागरिकांकडून निवेदने देण्यात येत होती. या मार्गाने जाताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेत ते पूर्णत्वास नेले आहे.
नाशिक-गुजरात हा महामार्ग पूर्णत्वास गेल्याने नाशिकपासून पेठपर्यंत जाण्यासाठी नागरिकांची वाट आता सुखकर झाली आहे. मात्र गुजरातकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने दिवस-रात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. याच महामार्गावर कोटंबीसारखा (Kotambi Ghat) अवघड घाट देखील आहे. या घाटात दररोज एक ना एक अपघात होत असल्याने त्याच्याही रुंदीकरणासाठी नागरिकांनी मागणी केली आहे.
पेठ ते चाचडगाव टोल नाका 23 ते 24 किलोमीटर अंतरावर असुन पेठ तालुक्यात आदिवासी शेतकरी व वाहन धारक यांना टोल माफ करण्यात यावा, या मार्गावरील सावळघाट तसेच कोंटबी घाटातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. सावळघाट व कोंटबी घाटातील अपघाती वळणे काढुन रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, तात्कळ दुरूस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मंत्री पवारांचे आश्वासन गेले कुठे?
दरम्यान टोलची उभारणी केल्यानंतर मंत्री डॉ. भारती पवार यांनी परिसरातील 20 किलोमीटर अंतरावरील वाहनधारकांना यात सुट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर काही नागरिकांना मासिक सवलत पास देखील दिला जाणार होता, मात्र याबाबत अद्यापही ठोस पाऊले उचलली नसल्याने परिसरातील नागरिकांना टोल भरावा लागत आहे.
तीन तासांचे आंदोलनही झाले..
चाचडगाव टोल नाका परिसरातील नागरिकांनी एकत्र येत या संदर्भात आंदोलन देखील छेडले आहे. परिसरातील वाहन धारकांना टोल मध्ये सुट देण्याबाबत तब्बल तीन तास आंदोलन करण्यात आले. यानंतर टोल प्रशासनाने टोल माफी बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल तसेच रस्ता दुरुस्तीचे किरकोळ कामे चालु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.