Nashik Agitation : नाशिकमधील वणीत स्वाभिमानीचे आंदोलन सुरू; रस्त्यावर कांदा, द्राक्षं फेकून सरकारचा निषेध; तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा
Nashik Agitation : नाशिक जिल्ह्यातील वणी (Wani) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर (Shirdi-Surat highway)आंदोलन सुरू केलं आहे.
Nashik Agitation : शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नासंदर्भात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Saghtana) वतीनं राज्यभर चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी (Wani) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी-सुरत महामार्गावर (Shirdi-Surat highway)आंदोलन सुरू केलं आहे. प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वाताखाली हे आंदोलन सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदे, द्राक्ष रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. सरकारला जर लोकशाही मार्गाची भाषा समजत नसेल तर अधिवेशनादरम्यान विधानभवनावर कांदे, द्राक्ष आणि जिल्हा बँकेच्या नोटीसा फेकू असा इशारा संदीप जगताप यांनी दिला आहे.
जिल्हा बँकेच्या नोटिसांच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी केला निषेध
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीन चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या विविध भागात आंदोलन सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील शिर्डी-सुरत महामार्गावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा आणि द्राक्षं रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध केला. तर काही शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या नोटिसांच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. स्वाभिमानीच्या कार्यकर्ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. सरकारने शेतीमालाच्या दरासंदर्भात चुकीची धोरण अवलंबली आहेत. त्यामुळं शेतकरी रस्त्यावर येत असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.
सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं
संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. वणीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रस्ता रोको केल्याची माहिती स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. सध्या सोयाबीन आणि कापसाचे दर घसरले आहेत. कांद्याचे दर घसरले आहे. अनेक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करायला सुरुवात केली आहे. नाशिक जिल्हा बँकेनं 62 हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव सुरू केले आहे. यामुळं शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे संदीप जगताप म्हणाले.
'या' प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू
शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज द्यावी, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम या प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. तसेच बुलढाण्यात शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :