राऊतांच्या आरोपानंतर नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी, अंबादास दानवे म्हणाले, 'ही निव्वळ स्टंटबाजी'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आले असता ते हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे पैशांनी भरलेल्या मोठमोठ्या बॅगा होत्या गंभीर आरोप केला होता. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आले असता ते हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या बॅगांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नाही, असा दावा करण्यात आला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नाशिकमध्ये दाखल झाले. हेमंत गोडसे यांच्यासाठी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रोड शो आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरताच मुख्यमंत्र्यांसोबत आज पुन्हा दोन ते तीन बॅग होत्या. हेलिकॉप्टरमधून बॅगा काढत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एका गाडीत ठेवण्यात आल्या. मात्र आज बॅगा तपासण्यात आल्या.
ही फक्त नाटकबाजी
याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, त्या दिवशी बॅगा का चेक केल्या नाहीत? आता आरोप केल्यानंतर ते बॅगांमध्ये काही घेऊन जाणार आहेत का? ही फक्त नाटकबाजी आहे. त्या दिवशी बॅगा का नाही चेक केल्या याचे उत्तर तपास यंत्रणांनी द्यावे. मुख्यामंत्र्यांनी आणलेल्या बॅगा कुठे गेल्या याची तपासणी करावी. आरोप केल्यानंतर तपासणी झाल्याचे दाखवायचे. नेहमी मुख्यमंत्री जशी शो बाजी करतात तशी त्यांनी केली आहे.
सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे
संजय राऊत म्हणाले की, आमच्याकडे पुरावे आहेत बॅगा कुठून आल्या आणि कुठे गेल्या, अशी विचारणा अंबादास दानवे यांना केली असता ते म्हणाले की, संजय राऊत दाखवतील, अजून निवडणुकीला चार दिवस बाकी आहेत. सगळ्यांना समान न्याय दिला पाहिजे. विमानातून येवो की हेलिकॉप्टरने येवो अशी पद्धतीने तपासणी करावी लागते. त्यातून देशाचे पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री असो कोणालाच सूट मिळत नाही. त्यामुळे बॅगा तपासल्याच गेल्या पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा