Unseasonal Rain : अवकाळी पाऊस अन् गारपिटीचा तडाखा, 100 पोपट दगावले, शेतीचेही मोठे नुकसान
Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पशू पक्षांनाही याचा मोठा फटका बसला आहे. तर नाशिक जिल्ह्यात शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
Nashik Unseasonal Rain : महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे शेतीचे (Agriculture) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने बळीराजा आर्थिक संकट सापडला आहे. तर पशू पक्षांनाही अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा फटका बसला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल नाशिक जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास जोरदार वारा व पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
गारपिटीमुळे 100 पोपटांचा मृत्यू
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Taluka) पोखरी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे 100 हून अधिक पोपटांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक पोपट गंभीर जखमी झाले. या सर्व पोपटांचे वास्तव्य पोखरी येथील एका पिंपळाच्या झाडावर होते. या झाडावर नेहमीच पोपटांचा किलबिलाट असायचा. आता मात्र किलबिलाट पूर्ण थांबला आहे.
सिन्नरला अवकाळीचा तडाखा
सिन्नर शहरासह तालुक्यातील डुबेरे, मनेगाव परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या. तसेच , पुर्व भागातील पांगरी, वावी, शहा, पंचाळे परिसरातही विजांचा कडकडाट सुरु झाला होता. त्यानंतर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. तसेच नांदुरशिंगोटे, दोडी, दापुर परिसरातही काही भागात पावसाच्या सरी बसरल्या. तालु्क्यातील सरदवाडी, पास्ते, जामगाव परिसरात जोरदार पावसासह गारा पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरदवाडी, पास्ते परिसरात मुबलक पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बाग आहेत. या गारांचा फटका बागांना बसण्याची शक्यता आहे. तसेच शेतात साठवण्यात आलेल्या मालाला व चाऱ्यालाही यामुळे फटका बसला आहे.
मालेगावात पाणीच पाणी
मालेगावला शहरालादेखील पावसाने झोडपून काढले. यामुळे मालेगावच्या पोलीस कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. तब्बल तीन ते चार तास मालेगावमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. अवकाळी पावसामुळे मालेगावमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
आजदेखील पावसाचा इशारा
काल सायंकाळी नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, सिन्नर आदी पट्ट्यात पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून सकाळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आला. मात्र सायंकाळी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आणखी वाचा
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा 'महावितरण' ला फटका; एका महिन्यात तब्बल 44 लाखांचे नुकसान