धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. दुध डेरी परिसरातील एक पेट्रोल पंपावर एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
Nanded Crime News : नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. दुध डेरी परिसरातील एक पेट्रोल पंपावर एकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. इंद्रजीत सिंग बावरी असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
इंद्रजीत सिंग बावरी हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना तीन ते चार जणांनी त्याचा हल्ला करत खंजिराने वार करत पळ काढला. इंद्रजीत सिंग बावरी हा हिस्ट्री सीटर आहे, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं ही हत्या गॅंगवर मधूनच झाली असावी, असा अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळतच पोलिस अधीक्षक नीलभ रोहन यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेमुळं मात्र दूध डेरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी
धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरात दोन गटात काल तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हातात लाठ्या काट्या तसेच दगडाने ही हाणामारी झाली आहे. हाणामारीचे व्हिडिओ हे मोबाईलमध्ये देखील चित्रित करण्यात आले आहेत. एकमेकाकडे पाहण्याच्या कारणावरून सुरु झालेला शाब्दिक वाद हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचला आहे.
राजकीय वादातूनच हे भांडण झाल्याची माहिती
भांडणाचं कारण हे अद्याप कळू शकलं नसलं तरी राजकीय वादातूनच ही भांडण झाली असल्याचं बोलले जात आहे. भर दुपारी भर चौकात भांडण सुरू झाल्याने परंडा शहरात एकच गोंधळ उडाला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ज्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या हाणामारीत अनेक जण जखमी झाले असले तरी पोलीस भीतीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले नसल्याचे समजत आहे. पोलिसांनी शहरात आता बंदोबस्त वाढवला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चार वर्गमित्रांवर केला हल्ला
शाळा म्हणजे सुरक्षिततेचं ठिकाण. पण त्याच शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याच्या हातात पुस्तकाऐवजी चाकू आला आणि क्षुल्लक वादाचं रूपांतर थेट रक्तरंजित हल्ल्यात झालं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारीमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने चार वर्गमित्रांवर चाकूने वार केल्याने खळबळ उडाली आहे. एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने केवळ शाळेच्या सुरक्षेचाच नाही, तर आजच्या किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेचाही गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. देवगाव रंगारी येथील खासगी शाळेत गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. जेवणाच्या सुट्टीत हात धुण्यासाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. वादानंतर संबंधित अल्पवयीन विद्यार्थी "तुम्हाला बघतोच" अशी धमकी देत निघून गेला. काही वेळाने तो पॉकेट चाकू घेऊन परत आला आणि वर्गातील चार विद्यार्थ्यांवर सपासप वार केले. या हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या हातावर, एका विद्यार्थ्याच्या पायावर आणि एका विद्यार्थ्याच्या पाठीवर चाकूचे वार झाले. गंभीर जखमी विद्यार्थ्याला घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं असून इतरांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.






















