(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अतिवृष्टी! दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी
Crops Damage in Nanded: नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
Crops Damage in Nanded : मराठवाड्यात अपेक्षित पाऊस (Marathwada Rains) नसल्याने अनेक भागात भर पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. मात्र याच मराठवाड्यात असलेल्या नांदेड (Nanded) जिल्ह्यात मात्र पावसामुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. कारण 21 आणि 22 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. एवढच नाही तर पावसाच्या पाण्यामुळे तब्बल 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली आहे. तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील 2 लाख हेक्टरवरील पिके (Crop) आडवी झाली आहेत. त्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. दरम्यान 21 आणि 22 जुलै रोजी जिल्ह्यात धुंवाधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. तर 21 जुलै रोजी झालेल्या पावसात 36 आणि 22 जुलैला 13 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे खरिपाच्या पिकाचे मोठं नुकसान झालं आहे. त्यातच पैनगंगा नदीसह छोट्या-मोठ्या नद्यांना देखील पूर आला. त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसले. ज्यात खरिपाचे पिके अक्षरशः वाहून गेली. सोबतच शेतातील जमीन देखील खरडून गेली.
नांदेडमध्ये तब्बल 757 गावांना तडाखा, 411 घरांची पडझड...
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे. 21 आणि 22 जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील एकूण 757 गावांना याचा फटका बसला आहे. तर या गावांतील 2 लाख 42 हजार 457 पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर याचवेळी 411 पक्क्या घरांची पूर्णत: आणि 820 पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. तर नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 13 कच्च्या घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर 23 लहान आणि 27 मोठी अशी 50 जनावरे पुराच्या पाण्याने दगावली. तसेच मुखेड तालुक्यातील माकणी आणि हदगाव तालुक्यातील कोथळ येथे पुरात वाहून दोघांचा मृत्यू झाला आहे.
असे झाले नुकसान...
खरडून गेलेली जमीन
अ. क्र. | तालुका | खरडून गेलेली जमीन |
1 | हदगाव | 286 हेक्टर |
2 | माहूर | 176 हेक्टर |
3 | देगलूर | 5537 हेक्टर |
4 | मुखेड | 2860 हेक्टर |
पिकांचे नुकसान...
अ. क्र. | तालुका | पिकांचे नुकसान |
1 | हदगाव | 23,198 हेक्टर |
2 | धर्माबाद | 743 हेक्टर |
3 | उमरी | 16 हेक्टर |
4 | हदगाव | 23,198 हेक्टर |
5 | देगलूर | 65,198 हेक्टर |
6 | मुखेड | 41,198 हेक्टर |
7 | हिमायतनगर | 397 हेक्टर |
8 | किनवट | 13,246 हेक्टर |
9 | माहूर | 13,445 हेक्टर |
इतर महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय, पाहा ड्रोनद्वारे घेतलेले धबधब्याचे विहंगम दृश्य