(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded News : अखेरच्या क्षणापर्यंत साथ निभावली! पतीच्या निधनानंतर पत्नीनेही प्राण सोडले; नांदेड जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना
Nanded : पतीच्या निधनानंतर एक दिवसाच्या अंतराने पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, दोघांच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड : पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच पत्नीनेही प्राण सोडल्याची मन पिळवून टाकणारी घटना नांदेड (Nanded) जिल्ह्यात समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वळग येथे ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीच्या निधनानंतर एक दिवसाच्या अंतराने पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, दोघांच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाधर नागाजी चंदावाड (वय 70 वर्षे) आणि अंजनाबाई गंगाधर चंदावाड (वय 65 वर्षे) असे मयत पती पत्नीचे नावं आहे.
वळग गावातील गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांनी लग्नानंतर आयुष्याचे 50 वर्षे सोबत घातले. मात्र, अंजनाबाई आजारी पडल्याने गंगाधर चंदावाड यांच्या डोक्यावर आघात झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे चंदावाड दुःखाचे डोंगर कोसळले. याच सर्वाधिक धक्का अंजनाबाई यांना बसला होता. दरम्यान, गंगाधर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच दुसऱ्या दिवशी अंजनाबाई यांनी देखील आपले प्राण सोडले. पतीने जीव सोडला म्हणून पत्नीच्या डोक्यावरही आघात झाला आणि त्यांनी देखील पतीप्रमाणेच जगाचा निरोप घेतला. या दोघांनी आयुष्याची 50 वर्षे प्रपंचात उन पावसाला तोंड देत संसार फुलविला होता. उभी हयात एकमेकाच्या सहवासात घालवल्यानंतर पतीच्या पश्चात आयुष्याची कल्पना ही सहन न झाल्यामुळे 65 वर्षाच्या अंजनाबाई यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला. दरम्यान, वळग येथे दोघांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वडिलापाठोपाठ आईनेही प्राण सोडल्यामुळे त्यांची मुले व नातवंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 50 वर्षाची संसार गाठ नियतीही तोडू शकली नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देण्याचे वचन उपरोक्त दाम्पत्याने पाळले आहे. चंदावाड पती-पत्नीच्या अंत्यसंस्काराला परिसरातील नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. तर, एकाचवेळी पती-पत्नीवर अंत्यसंस्काराची वेळ आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.
आयुष्यभर एकेमकांची साथ सोडली नाही...
गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांच्या लग्नाला 50 वर्षे झाली होती. लग्नाच्या वेळी एकेमकांना साथ देण्याचं दिलेलं वचन त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले. 50 वर्षांच्या काळात त्यांच्यावर अनेक संकटे आली पण त्यांच्या संसाराची गाठ शेवटच्या श्वासापर्यंत नियतीही तोडू शकली नाही. प्रत्येक सुखदुःखात दोघांनी एकमेकांना साथ दिली. प्रत्येक अडचणीचा मिळून सामना केला. मोठ्या कष्टाने लेकरांना मोठं करत त्यांच्या पायावर उभं केलं. विशेष म्हणजे एकेमकांना साथ देण्याचं वचन त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत टिकवले.
इतर महत्वाच्या बातम्या: