(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Crime : अंधश्रद्धेपोटी घोरपडीच्या गुप्तांगाची तस्करी करणारी टोळी ताब्यात, नांदेड वनविभागाची कारवाई
Smuggling : आजची कारवाई ही नादेड वन विभागाची गेल्या 20 वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जातंय. या कारवाईत घोरपडीच्या गुप्तांगासह दुर्मिळ वन्यजीवांच्या अवयवांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नांदेड: वन विभाग कार्यालयाने (Nanded Forest Department) धाडशी कारवाई करत दुर्मिळ वन्यजीवांची तस्करी (Smuggling) करणारी टोळी गजाआड केली आहे. यात नांदेड शहरातील नामांकित मोगडपल्ली आयुर्वेदिक मेडिकलमध्ये धाड टाकत घोरपड वन्य प्राण्याचे गुप्तांग आणि समुद्रातील श्रेणी एक मधील वनस्पती ब्लॅक कोरलसह अन्य वन्य जीवांचे अवयव ताब्यात घेतले आहेत.
एवढी मोठी कारवाई गेल्या वीस वर्षात झाली नसल्याची माहिती वनविभाग कार्यालय नांदेडने दिली आहे. ग्रामीण भागात उच्चभ्रू लोक अंधश्रद्धेपोटी धनसमृद्धीसाठी घोरपड या प्राण्याचे गुप्तांग खरेदी करतात. दरम्यान, अंधश्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात घोरपड प्राणी मारून हे अवयव विकले जातात. तर ब्लॅक कोरल ही समुद्रातील दुर्मिळ वनस्पती असून अन्न साखळीत महत्वाची भूमिका बजावते. अशा वनस्पतीच्या तस्करीवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नांदेड येथील वन विभाग आणि वन्यजीव अपराध नियंत्रण (WCCB) आणि TRAFFIC INDIA यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये वन्यजीव अवयवांचा साठा जप्त करण्यात आला असून वन्यजीव अवयव साठाही जप्त करण्याची नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
वन विभागाच्या पथकातील एका सदस्यांनी बनावट ग्राहक म्हणून संपर्क संपर्क साधला असता, आरोपीने साडेतीन हजार रुपये प्रति दराने हात्था जोडी (घोरपडीचे गुप्तांग) विक्री करीत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सापळा रचून हात्था जोडी अथवा घोरपड गुप्तांग, ब्लॅक कोरलसहित आरोपी स्वप्नील बाबुराव सूर्यवंशी (36) रा. नांदेड, यास हुजूर साहेब रेल्वे स्टेशन नांदेड येथून ताब्यात घेतलं.
सदर आरोपीने दिलेल्या माहितीवरून त्यास वन्य जीवाच्या अवयवाचा पुरवठा करणारे आणखी दोन जण असल्याचे चौकशीत समोर आलं आहे. यात नादेंड शहरातील प्रसिद्ध असलेल्या मोडपल्ली मेडिको अँड किराणा यांचे मालक आरोपी व्ही व्ही मोडपल्ली रा. कैलास नगर, नांदेड तर दुसरा दुकानातील नोकर कैलास पुरभाजी कदम, रा. निळा यास नांदेड शहरातील श्रीनगर भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
दरम्यान, मोगलपल्ली मेडिको अँड किराणा स्टोअर्स या दुकानावर वनविभागाच्या पथकातील सदस्यांनी बनावट ग्राहक म्हणून हात्था जोडीची मागणी केली असता, त्यांनी सातशे रुपये प्रति नग हत्था जोडी दिली. त्याच वेळी दुकानात धाड टाकून वरील दोन आरोपीस पकडले आणि त्यांच्या दुकानातील झडती घेतली असता त्यांच्याकडून इतर तीन नग हात्था जोडी, पायाजोडी 15 नग आणि एक नग ब्लॅक कोरल हस्तगत केलं आहे.
काय आहे हत्था जोडी ?
हात्था जोडी हे घोरपड या वन्य प्राण्यांचे गुप्तांग आहे. घोरपड हे भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे परिशिष्ट 1 भाग 2 मधील वन्य प्राणी आहे. ब्लॅक कोरल हा परिशिष्ट 1 मधील भाग 4 (अ) मधील प्राणी आहे. वरील तिन्ही आरोपी विरोधात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9 कलम 49 कलम 49 (ब) व कलम 52 नुसार वन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.