Nanded : व्यावसायिक संजय बियाणी हत्येनंतर कुटुंबात आर्थिक वादातून कलह; दीर-भावजयीमध्ये जमिनीवरून वाद
नांदेडमधील उद्योजक संजय बियाणी यांच्या हत्येचा छडा लागल्यानंतर बियाणी कुटुंबीयांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून आर्थिक कलह निर्माण झाला आहे.
नांदेड : नांदेड येथील प्रसिद्ध उद्योजक संजय बियाणी यांची आज काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान त्या हत्येचा छडा नांदेड पोलिसांनी आज काही दिवसांपूर्वी लावून नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु हत्येचा छडा लागल्यानंतर बियाणी कुटुंबीयांमध्ये आर्थिक वादातून कलह निर्माण झाला.
दरम्यान या आर्थिक कलहातून संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी व भाऊ प्रवीण बियाणी यांनी विमानतळ पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यात भाऊ प्रवीण बियाणी याने संजय बियाणीच्या पत्नी अनिता बियाणी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. तर संजय बियाणी यांची पत्नी अनिता बियाणी यांनी आर्थिक व्यवहाराची माहिती असणारी डिस्क प्रवीण बियाणी यांनी चोरल्याची तक्रार दिली आहे.
संजय बियाणी हयात असताना त्यांना विश्वासात घेऊन रवी बियाणी यांच्या नावे 13 एकर तर प्रवीण बियाणी यांच्या नावे 6 एकर जमीन अशी एकूण 19 एकर जमीन केली होती. दरम्यान बियाणी यांच्या हत्येनंतर संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी रवी बियाणी व प्रवीण बियाणी यांना सदर जमीन आपला मुलगा राज बियाणी यांच्या नावे करून देण्यास सांगितली. पण जमीन नावावर करून द्यायची असेल तर रवी बियाणी यांनी दोन कोटी रुपये व प्रवीण बियाणी यांनी 94 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप अनिता बियाणी यानी केला आहे. तर प्रवीण बियाणी यांनी सदर जमीन आपण स्वतः घेतली असून राज मॉल येथील कार्यालय सुद्धा संजय बियाणी यांचे नसून आपले असल्याचे सांगितलंय. तर परस्पर विरोधी तक्रार दिल्यानंतर प्रवीण बियाणी यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ज्या ठिकाणी रुग्णालयातही पोलिसांचा खडा पहारा बियाणी यांना आहे .परंतु या वादाविषयी विमानतळ पोलिसांनी मात्र काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
दीर प्रवीण बियाणी यांनी दोन दिवसांपूर्वी घरी येऊन वाद घातल्याचा व्हीडिओ ABP माझा च्या हाती लागलाय. दरम्यान संजय बियाणी यांच्या हत्येनंतर अवघ्या अडीच महिन्यात आर्थिक व्यवहारातुन कौटुंबिक कलह मात्र उफाळलाय ज्यामुळे आता ऐका नवीन वादाला तोंड फुटलय हे मात्र नक्की आहे.