Laxman Hake : शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून जरांगे स्वतःची गादी निर्माण करताय, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Laxman Hake : ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा कट या महाराष्ट्रात रचला गेला आहे. त्यात महाराष्ट्रातले आजी-माजी मुख्यमंत्री सामील असल्याचा दावाही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय.
नांदेड : झुंडशाहीच्या माध्यमातून जात वर्चस्व निर्माण करण्यासाठी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे स्वतःची गादी निर्माण करू पाहत आहेत, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केलाय. आरक्षण बचाव यात्रेसाठी लक्ष्मण हाके नांदेड येथे दाखल झाले आहेत. उद्या देगलूर येथे लक्ष्मण हाके यांची सभा पार पडणार आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील (Laxman Hake) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
लक्ष्मण हाके म्हणाले की, दुसऱ्यांदा वडीगोद्रीत उपोषण झाले तेव्हापासून माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी आमच्या उपोषणस्थळी दोन-चार युवक घुसले होते. त्यांना यथेच्छ प्रसाद देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. जर पोलिसांनी त्याच दिवशी कारवाईचा बडगा उगारला असता तर पुण्यातला माझ्यावर झालेला भ्याड हल्ला झालाच नसता, असे त्यांनी म्हटले आहे.
कितीही दसरा मिळावे घेतले तरी आम्हाला फरक पडत नाही
मनोज जरांगे यांचा नारायण गडावर दसरा मेळावा पार पडणार आहे. याबाबत विचारले असता लक्ष्मण हाके म्हणाले की, हे असले दसरा मळावे राज्यात नऊ-दहा ठिकाणी होतात. आमच्या लाखांच्या जत्रा भरतात. नऊ दिवस आमचा लाखांचा मेळावा असतो. त्यामुळे असलं काहीतरी मेळावा करायचा आणि त्यातून राजकारण करायचे. झुंडशाही तयार करायची, वर्चस्वाची भावना व्यक्त करण्यासाठी असे कितीही दसरा मिळावे घेतले तरी आम्हाला याचा फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
जरांगे स्वतःची गादी निर्माण करू पाहताय
लक्ष्मण जरांगे कशासाठी दसरा मेळावा घेत आहेत. याबाबत विचारले असता लक्ष्मण हाके म्हणाले की, झुंडशाहीच्या माध्यमातून जात वर्चस्व निर्माण करण्यासाठी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे स्वतःची गादी निर्माण करू पाहत आहेत. जरांगे राजकारण करणार असतील तर आम्हालाही पुढच्या कालावधीत राजकारण करावे लागेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा कट
मनोज जरांगे यांनी दोन कोटी मराठ्यांना ओबीसीमध्ये आणल्याचे म्हटले आहे. याबाबत विचारले असता लक्ष्मण हाके म्हणाले की, खरे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत विचारले पाहिजे. सगळे नेतेमंडळी म्हणतात की ओबीसींचे आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. त्याचवेळी जरांगे म्हणतात की दोन कोटी मराठे ओबीसीत आले. मला वाटते की, ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा कट या महाराष्ट्रात रचला गेला आहे. त्यात महाराष्ट्रातले आजी-माजी मुख्यमंत्री सामील आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हा महाराष्ट्राचा बहुजनांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा राहिलेला नाही तर जात वर्चस्वाची भाषा बोलणाऱ्या क्षत्रिय मराठ्यांचा हा महाराष्ट्र झालेला असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
आणखी वाचा