Nagpur : मूक-बधीर मुलाला सहा वर्षानंतर केले बिहारमधील पालकांच्या स्वाधीन, रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळला होता सोचनकुमार
बिहारमधील संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून सोचनकुमारच्या पालकांचा शोध घेण्यात आला. त्यानंतर सोचनकुमारला आई रंजुदेवी यादव यांच्या ताब्यात देण्यात आले. सोचनकुमार 6 वर्षांनी त्याच्या कुटुंबात परतला.
![Nagpur : मूक-बधीर मुलाला सहा वर्षानंतर केले बिहारमधील पालकांच्या स्वाधीन, रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळला होता सोचनकुमार Sochan Kumar a deaf mute boy was found abandoned at a railway station in custody of his parents after six years in Bihar Nagpur : मूक-बधीर मुलाला सहा वर्षानंतर केले बिहारमधील पालकांच्या स्वाधीन, रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळला होता सोचनकुमार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/24/6c12fa247314a6b966ef2d9a5c2fe8ba166135041356189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनवर बेवारस आढळलेल्या सोचनकुमार बलम यादव या मूक-बधिर बालकाला नागपूर येथील मुलांच्या शासकीय बालगृहाने 6 वर्षानंतर बिहारमधील त्याच्या आईच्या स्वाधीन केले. हा बालक 2016 मध्ये नागपूरच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांना बेवारस सापडला होता. 20 नोव्हेंबर 2016 रोजी त्याला बाल कल्याण समितीच्या आदेशाने मुलांच्या शासकीय बालगृहात दाखल करण्यात आले. तो मूकबधिर असल्याने त्याला 21 मार्च 2017 रोजी शंकरनगर चौक येथील मूक बधिर विद्यालयात स्थानांतरित करण्यात आले.
नागपूर येथील मुलांच्या शासकीय बालगृहात मूक - बधिर बालकांसाठी व्यवस्था नसल्याने त्याला 16 ऑक्टोबर 2018 रोजी हुडकेश्वर येथील मूक-बधिर विद्यालयात स्थानांतरित करण्यात आले. कोरोना काळात हे विद्यालय बंद झाले. 25 एप्रिल 2020 रोजी महिला व बाल विकास अंतर्गत राहुल बालसदन, महेंद्रनगर येथे दाखल करण्यात आले. राहुल बालसदन महेंद्रनगर ही संस्था मान्यते अभावी डिसेंबर 2021 मध्ये बंद करण्यात आली. या संस्थेतील सर्व 16 बालकांना मुलांचे शासकीय बालगृह (कनिष्ठ), पाटणकर चौक नागपूर येथे 16 डिसेंबर 2021 रोजी दाखल करण्यात आले.
आधारकार्ड अपडेट करताना मिळाली माहिती
पाटणकर चौक येथील संस्थेत आलेल्या या नवीन बालकांचे आधार कार्ड तयार करणे सुरु झाले. परंतु सोचनकुमार बलम यादव याचे कार्ड वारंवार बायोमेटीक रिजेक्ट होत होते. संस्थेचे अधीक्षक विनोद दाबेराव व समुपदेशक महेश रणदिवे यांनी आधार कार्ड सेवा केंद्र मानकापूरचे प्रबंधक कॅप्टन अनिल मराठे यांच्याशी संपर्क करून चौकशी केली. त्यांनी सांगितले की या बालकाचे आधार कार्ड आधी काढलेले असल्याने नवीन कार्ड तयार होणार नाही.
सहा वर्षांनी परतला सोचनकुमार
बालकाच्या हाताचे ठसे घेऊन नवीन आधार कार्ड तयार करण्याची कारवाई करण्यात आली तेव्हा बालकाचे नाव व पत्ता सोचनकुमार बलम यादव, राहणार मछरा, ता.अलौली, जि.खगरिया (बिहार) 848203 असल्याची माहिती मिळाली. यानंतर बिहारमधील संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून सोचनकुमारच्या पालकांचा शोध घेण्यात आला व बाल कल्याण समिती नागपूर यांच्या आदेशाने सोचनकुमारला आई रंजुदेवी बलम यादव यांच्या ताब्यात देण्यात आले. सोचनकुमार 6 वर्षांनी त्याच्या कुटुंबात परतला.
महत्त्वाच्या बातम्या
Green Initiative : प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, देशाचे वॉटरमन राजेंद्र सिंह यांचे आवाहन
Intresting : तब्बल 34 वर्षांनंतर 29 आंदोलकांना वॉरंट, 1988 मध्ये रोखली होती 'विदर्भ एक्स्प्रेस'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)