(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Central Jail : मध्यवर्ती कारागृहात तस्करीचे रॅकेट; पोलीस शिपायाची मदत, सात जणांविरोधात गुन्हे
कारागृहातील तस्करीत पोलीस शिपायांचा सहभाग असल्याची बाबही उघडकीस आल्यानंतरही वरिष्ठांकडून शिपायांवर ठोस कारवाई करण्यात येत नाही. अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे सर्व घडवून आणण्यात येत असल्याची चर्चा आहे.
Nagpur News : नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, बॅटरी आणि गांजा आदींची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून यामध्ये पोलीस शिपायांचा सहभाग असल्याची बाब उघडकीस आली आहे. सुरुवातील पोलीस आयुक्तांनी (Nagpur Police) फौजफाट्यासह टाकलेल्या धाडीत काहीच ठोस आढळून आले नव्हते. मात्र पुन्हा एकदा कारागृहात टाकलेल्या छाप्यात पोलीस शिपायांच्या मदतीने कुख्यात गुन्हेगारांना सर्रास गांजा, मोबाईल, बॅटरी पुरवल्या जात असल्याचे रॅकेट उघडकीस आलं आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुख्यात श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड यांचा समावेश आहे. श्रीकांत थोरात, गोपाल पराते, राहुल मेंढेकर या तिघांवरही मोका आणि एमबीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. काही दिवसांनंतर ते बाहेर आले. त्यापूर्वी कारागृहात त्यांची निषेद वासनिक आणि वैभव तांडेकर यांची ओळख झाली. निषेद वासनिक याने आठ महिन्यांपूर्वी क्रिप्टो करन्सीच्या नावाने अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी त्याला लोणावळ्यातून अटक केली होती.
कारागृहात असताना झालेल्या मैत्रीतून श्रीकांत, गोपाल आणि राहुल बाहेर पडताच त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम खरेदी केले. यानंतर अजिंक्य आणि प्रशांत राठोड यांच्यामार्फत निषेद आणि वैभव यांच्याकडे त्यांनी पाठवले. त्यानंतर अनेकदा व्हॉट्सअॅपद्वारे चिठ्ठीच्या माध्यमातून त्यांनी गांजा आणि इतर साहित्यही कारागृहात मागवल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत आणि अजिंक्य हे साहित्य वासनिकला पोहोचवाचे. कारागृहात मोबाईलचा वापर होत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेला गोपनीय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी युनिट-2 चे किशोर पर्वते यांच्या पथकाने आरोपींना अटक करत धंतोली पोलिसांच्या स्वाधीन केले.
अधिकाऱ्यांवरही 'वॉच'
आतापर्यंत अनेकवेळा कारागृहातील तस्करीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात पोलीस शिपायांचा सहभाग असल्याची बाबही उघडकीस आली आहे. यानंतरही वरिष्ठांकडून या शिपायांवर ठोस कारवाई करण्यात येत नाही. अधिकाऱ्यांच्या वरदहस्तानेच हे सर्व घडवून आणण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात कारागृहातील काही अधिकारीही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
ही बातमी देखील वाचा