(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain Forecast : धुळवडीला पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Rain Forecast : पश्चिम विदर्भात पुढील तीन दिवस, खासकरुन सात मार्च रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक गौतम नगराळे यांनी दिली आहे.
Rain Forecast : धुळवडीला पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. पश्चिम विदर्भात (West Vidarbha) पुढील तीन दिवस, खासकरुन सात मार्च रोजी अवकाळी पावसाचा तडाखा बसू शकतो अशी माहिती नागपूरच्या (Nagpur) प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक गौतम नगराळे यांनी दिली आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावतीच्या काही भागात पावसासह गारपीट होण्याचीही शक्यता नगराळे यांनी व्यक्त केली आहे. उत्तर पश्चिम दिशेतून निर्माण होत असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे असे घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ढगाच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. धुळवडीला म्हणजेच 7 मार्च रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं गौतम नगराळे यांनी सांगितलं.
'या' जिल्ह्यातही अवकाळी पाऊस
दरम्यान राज्यातील विविध भागात कालपासून (5 मार्च) अवकाळी पाऊस कोसळत आहे. नाशिक, पालघर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाचा अंदाज
दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल.
फळबागा, पिकांना फटका
राज्यात सातत्याने तापमानात चढ उतार होत आहेत. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. या हवामानाचा परिणाम रब्बी हंगामाच्या पिकांवर (Rabi Crop) होत आहे. त्यातच अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू आणि हरभरा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय पिकांवर रोग पडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तसंच फळबागांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
दरम्यान शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची काढणी सुरु केली आहे. यामध्ये तूर, हरभरा, वाल पिकाची काढणी सुरु आहे. अशातच अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली.
VIDEO : Unseasonal Rain on Holi : धुळवडीला पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
संबंधित बातमी
Unseasonal Rain : पालघर, नाशिक, बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना फटका