नागपूर : आयआयटी मुंबई सारख्या नामांकित संस्थेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी बाजूला ठेऊन एक अवलीया दोन लाख किलोमीटरच्या प्रवासाला निघालाय. प्रा. चेतन सिंह सोलंकी असे या अवलीयाचं नाव आहे. प्रा. चेतन सिंह सोलंही यांना या दोन लाख किलोमीटरच्या प्रवासादरम्यान सलग अकरा वर्षे कुटुंबापासून लांब राहावे लागणार आहे.
प्रा. सोलंकी हे सध्या एनर्जी स्वराज्य यात्रेवर आहेत. 2020 पासून सुरु झालेली त्यांची एनर्जी स्वराज्य यात्रा 2030 च्या अखेरपर्यंत म्हणजेच एकूण अकरा वर्ष चालणार आहे. या कालावधीत ते भारतात दोन लाख किलोमीटरची यात्रा करून सुमारे शंभर कोटी लोकांना भेटून त्यांना ऊर्जेच्या बचतीसंदर्भात जागृत करणार आहेत.
प्रा. चेतन सिंह सोलंकी यांचं म्हणणं आहे की, "सध्या आपण आपल्या गरजेपेक्षा खूप जास्त ऊर्जा वापरत असून त्याचे अत्यंत भीषण परिणाम पर्यावरणावर होत आहेत. आपल्याला भविष्यात अत्यंत भीषण नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यायचे नसेल आणि पर्यावरणाचे रक्षण करून आपली पृथ्वी येणाऱ्या पिढीसाठी किमान राहण्याजोगी ठेवायची असेल तर आजच आपल्याला आपला ऊर्जेचा वापर कमी करावा लागणार आहे. हाच संदेश देशातील खेडोपाडी नेण्यासाठी चेतन सिंह यांनी शैक्षणिक पेशा, मोठा पगार, मुंबईतील सुखवस्तू आयुष्य, कुटुंबाच्या सहवासासह सर्वकाही त्याग केले आहे.
प्रा. सोलंखी हे या प्रवासासाठी एका बसमधून निघाले आहेत. आता ही बसच त्यांचे घर आणि कार्यालय झाली आहे. दिवसभर यात्रा करणे, ठिकठिकाणी थांबून लोकांना पेट्रोल, डिझेल, वीज आणि इतर कोणत्याही ऊर्जेच्या कमीत कमी वापराबद्दल जागृत करणे, कमीत कमी ऊर्जेचा वापर करून चांगलं आयुष्य कसं जगावं? याबद्दल लोकांना प्रशिक्षित करणे आणि रात्री त्याच बसमध्ये झोपणे असे त्यांचा दिनक्रम सुरू आहे.
26 नोव्हेंबर 2020 पासून भोपाळमधून यात्रा सुरु करून चेतन सिंह यांनी उत्तर भारतात आजपर्यंत 14 हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केली आहे. 2030 च्या अखेरपर्यंत 50 कोटी भारतीयांना प्रत्यक्ष आणि 50 कोटी लोकांना डिजिटली भेटून पारंपरिक ऊर्जेचा वापर टाळून जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी ते प्रेरित करणार आहे.
प्रा. चेतन सिंह सोलंकी यांना सौर ऊर्जेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोलंकी ज्या बसमधून एनर्जी स्वराज यात्रेवर निघाले आहेत त्या बस मधील प्रत्येक सोय सौर उर्जेवर आधारित आहे. बस मधील लाईट्स, पंखा किंवा एयर कंडिशन किंवा लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जाणाऱ्या एलईडी स्क्रीनसह सर्व गोष्टी सौर उर्जेवर चालत आहेत.
पूर्ण 11 वर्षे फक्त सौर उर्जेवर आश्रित राहून लोकांसमोर उदाहरण ठेवण्यासाठी चेतन सिंह यांनी हे वेगळं आयुष्य निवडलं आहे. त्यामुळे जलवायू बदलांबद्दल अनेक लोक मोठ-मोठी चर्चा करतात. मात्र, स्वतःच्या सुखवस्तू आयुष्याची 11 वर्षे पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा पद्धतीने देणारे मोजकेच असतात. चेतन सिंह सोलर मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- सर्वात जास्त दारू पिणारे लोक भाजपमध्ये ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
- Anil Deshmukh : ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब
- Breaking: सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचा दबाव; परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट