Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेल्या जबाबात  आपल्या गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे कारण सांगितले आहे. ईडीच्या आरोपपत्रातून राजीनाम्याचे कारण समोर आले आहे. 
कथित 100 कोटींची वसूली प्रकरणी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. 


अनिल देशमुख यांनी ई़डीला सांगितले की, 20 मार्च 2021 रोजी परमवीर सिंह यांनी माझ्यावर आरोप करणारे एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पत्राच्या आधारे अॅड. जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर हायकोर्टाने 5 एप्रिल 2021 रोजी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. त्यानंतर नैतिकतेच्या आधारे आपण राजीनामा दिला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 


अँटिलिया प्रकरणी सिंह यांच्याकडून सरकारची दिशाभूल


रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्य सरकारची दिशाभूल करत खोटी माहिती दिली असल्याचे अनिल देशमुख यांनी ईडीला सांगितले.  देशमुख यांनी सांगितले की, 5 मार्च 2021 रोजी विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होते. त्यावेळी माहिती करून घेण्यासाठी परमवीर सिंह यांना विधानसभेत बोलवण्यात आले होते. त्यावेळी मी गृहमंत्री होतो. सिंह यांना बोलावले त्यावेळी माझ्यासह अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मनसुख हत्या आणि अँटिलिया प्रकरणी परमवीर सिंह देत असलेली माहिती दिशाभूल करणारी होती. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे देण्यात आला असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. काही दिवसानंतर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर ब्रिफिंग करण्यात आली. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि गृहविभागाचे इतर अधिकारी होते. त्यावेळी परमवीर सिंह यांनी सरकारची दिशाभूल करत असून या प्रकरणातील सत्य लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. या ब्रिफिंग दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या इनोव्हा कारचा वापर सचिन वाझेने केला होता. या ब्रिफिंगनंतर काही दिवसांत एनआयएने तपास आपल्या हाती घेतला आणि 13 मार्च 2021 रोजी वाझेला अटक करण्यात आली. परमवीर सिंह हे या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे मला नंतर समजले होते असेही देशमुख यांनी सांगितले. 


मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने परमवीर यांची बदली


राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून परमवीर सिंह यांना पोलीस आयुक्त पदावरून हटवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना होमगार्डचे महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे देशमुख यांनी म्हटले.


देशमुख यांनी पुढे म्हटले की, 20 मार्च 2021 रोजी परमवीर सिंह यांनी माझ्यावर आरोप करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या आधारे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. हायकोर्टाने 5 एप्रिल 2021 या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नैतिकतेच्या आधारे गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले.