नागपूर : ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांची डोकी भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याला गरज भासली तर ताब्यात घेऊ अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 


परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी 31 जानेवारी रोजी आक्रमक झाले होते. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हे आंदोलन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली असून त्याला आता 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागपुरातही विकास फाटक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे गरज भासली तर त्याला ताब्यात घेऊ असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.  


31 जानेवारी रोजी नागपुरात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान तोडफोड झाली होती. त्यामुळे विकास फाटक याच्यावर नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी त्याच दिवशी रात्री दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


विद्यार्थ्यांना चिथावणी देत रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आणि हिंसा करण्यामध्ये हिंदुस्थानी भाईचा हात असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी विकास फाटक याला विना परवानगी गर्दी करत आंदोलन करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, दंगल करणे तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. 


दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांविरूद्ध नागपूर पोलीस कारवाई करणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवरून पोलीस युवकांचा शोध घेत आहेत. त्यामुळे या तपासासाठी गरज भासल्यात विकास फाटक याला नागपुरात आणले जाणार आहे. 


महत्वाच्या बातम्या