मुंबई : किरणा दुकानातून वाईन विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भाजप नेत्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. परंतु, आता किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे. सर्वात जास्त दारू पिणारे भाजपमध्ये आहेत असा टोला नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.  


सुपर मार्केटमधून वाईन विक्रीवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवंर नवाब मलिक यांनी हल्लाबोल केला आहे. भाजपकडून किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास विरोध केला जात आहे. परंतु, भाजप नेत्यांचेच वाईन शॉप आणि बार जास्त असून भाजमध्येच सर्वात जास्त दारू पिणारे आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली. 


नवाब मलिक म्हणाले, भाजपच्या काही केंद्रीय मंत्र्यांचे आणि माजी मंत्र्यांचे बार आहेत. भाजपकडून वाईन विक्री करण्यास विरोध असेल तर ज्या भाजपच्या नेत्यांकडे बारचे परवाने आहेत त्यांनी ते परत केले पाहिजेत. याबरोबरच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी शपथ घेतली पाहिजे की, दारू पिणार नाही. भाजपचे काही खासदार सांगत आहेत की, कभी-कभी थोडी पिया करो, असा टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला. 


नवाब मलिक यांच्या या वक्तव्याला भाजप नेते आमदार राम कदम यांनी उत्तर दिले आहे. राज्यातील प्रत्येक घरात या तिन्ही पक्षाच्या नेत्यांवर लोक टीका करत आहेत. राज्यातील एकाही नागरिकाची किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याची मागणी नव्हती. परंतु, राज्य सरकारने हा निर्णय घेतला. लोकांकडून टीका होऊ लागल्यामुळे या सरकारमधील मंत्री विषय भरकटवण्यासाठी काहीही बोलत आहेत. तरूणांना रोजगार देण्याएवजी राज्य सरकार त्यांच्या हातात वाईन देत आहे. कोणत्या दिशेने राज्य चालले आहे, असा प्रश्न राम कदम यांनी यावेळी उपस्थित केला. 


महत्त्वाच्या बातम्या :