Parambeer Singh : सचिन वाझे आणि अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी दबाव होता असा जबाव ईडीला दिला आहे. यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमवीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना परमबीर यांनी धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते.
या बैठकीच्या दरम्यान सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती असेही परमबीर यांनी 'ईडी'ला सांगितले.
वाझेच्या पोस्टिंगसाठीही सूचना
सचिन वाझे यांची पोलीस दलात पुनर्नियुक्ती केल्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत पोस्टिंग देण्याबाबतची सुचना करण्यात आली होती. त्याशिवाय काही महत्त्वाची जबाबदारी देण्यास सांगितले होते. त्याशिवाय सचिन वाझेंना CIU ची जबाबदारी देण्यात आली होती. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांचा तपास CIU कडून करण्यात येत होता. हा तपास वाझेंकडे देण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितले होते, असे परमबीर सिंह यांनी ईडीला सांगितले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री थेट सचिन वाझेला बोलावून या महत्त्वाच्या प्रकरणांची माहिती घेत होते.
अनिल परब आणि गृहमंत्र्यांकडून PSI आणि DCP च्या बदलींची यादी
मुंबई पोलीस दलात बदल्यांसाठी असलेल्या समितीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त असतात. या समितीमध्ये पीएसआय ते डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जातो. मुंबई पोलिसांतर्गत बदल्यांची यादीही गृहमंत्रालयात तयार करण्यात आली होती. ही यादी मला स्वतः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा दिली होती. त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे किंवा त्यांचे ओएसडी रवी व्हटकर यांनीही अनेकदा दिली होती. बदल्यांची ही यादी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून दिली जात होती अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली. या यादीची कोणतीही नोंद नसल्याचेही त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Anil Deshmukh : ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब
- Praveen Raut Arrested : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई