Gadkari: गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीचा फोटो एबीपी माझाच्या हाती, आरोपी जयेश कांथाची नागपूर पोलिसांसमोर डायलॉगबाजी
नितीन गडकरींना धमकी दिलेल्या फोनचं लोकेशन बेळगाव तुरुंगात दिसलं होतं मात्र तीन दिवसांनंतरही पोलिसांना तो फोन हस्तगत करता आला नाही. गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीचा फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
Nagpur News : नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) कार्यालयात 14 जानेवारीला दुपारी फोन करुन धमकी देणाऱ्या गँगस्टर जयेश कांथा याला पोलिसांनी अटक तर केली. मात्र त्याने का धमकी दिली? कुणाच्या सांगण्यावरुन दिली? ज्या फोनवरुन धमकी दिली तो फोन कुठे आहे?, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना अद्याप मिळालेली नाहीत. हे कमी म्हणून की काय आता या आरोपीने पोलिसांसमोरच डायलॉगबाजी सुरु केली आहे. "जाओ पहले फोन ढूंढ के लाओ" असे डायलॉग त्याने पोलिसांसमोर मारल्याची माहिती समोर आली आहे.
बेळगावातील तुरुंगातून गडकरींना धमकीचा फोन
पोलीस तपासात आरोपीने धमकी दिलेल्या फोनचं लोकेशन बेळगाव तुरुंगात दिसलं होतं मात्र तीन दिवसांनंतरही पोलिसांना तो फोन हस्तगत करता आला नाही. गडकरींना धमकावणाऱ्या आरोपीचा फोटो एबीपी माझाच्या हाती लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन बेळगाव तुरुंगातून आला होता. बेळगावच्या तुरुंगात कैदेत असलेल्या जयेश कांथा नावाच्या सराईत गुन्हेगाराने हा कॉल केला होता. जयेश कांथा याने काही वर्षांपूर्वी केरळमध्ये जाऊन धर्म परिवर्तन केले असल्याची माहिती मिळाली आहे. जयेश कांथा याने तुरुंगाच्या आत नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून कॉल केल्याचं समोर आले आहे.
यापूर्वी 2016 मध्ये तो जेल तोडून पळून गेला होता. शिवाय त्याने जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संघ मुख्यालयात धमकीचा फोन कॉल कुठून आला?
काही दिवसांपूर्वी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला उडवून टाकू अशाच धमकीचा कॉल संघ कार्यालयात आला होता. त्याचा तपास नागपूर पोलिसांनी सुरु केला. मात्र अजूनपर्यंत त्यासंदर्भातही कुठली ठोस माहिती तपासात समोर आलेली नाही. 'एबीपी माझा'ला खात्रीलायक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे संघ मुख्यालय उडवून टाकण्याची धमकी देणारा तो कॉल इंटरनेट कॉल होता. आतापर्यंतच्या पोलीस तपासामध्ये आरएसएस कार्यालयात आलेल्या धमकीच्या कॉलचा लोकेशन वारंवार बदलत असल्याचे दिसून आले आहे. हे लोकेशन कधी सिंगापूर, कधी इंडोनेशिया, कधी मलेशिया अशा विविध ठिकाणचे आढळून येत आहे.