(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोपटाचा धंदा माझा नाही, फडणवीसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात; नवाब मलिकांचा पलटवार
Nawab Malik on Devendra Fadnavis : पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात, ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात, असं म्हणत नवाब मलिक यांनी पलटवार केलाय.
Nawab Malik on Devendra Fadnavis : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे भाजपचे पोपट आहेत. भाजपचा जीव त्या पोपटात अडकला आहे, असा मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी आरोप-प्रत्यारोप करताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लगावला होता. मलिक यांच्या या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रती टोला लगावला. फडणवीस याप्रकरणी बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलत आहे ना? यावर बोलताना पोपटाचा धंदा माझा नाही, असं प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी दिलं आहे.
दरम्यान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला सध्या वेगळं वळण लागलं आहे. अशातच या प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. तसेच या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळातही वादंग होताना दिसत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात 'पोपट वॉर' पाहायला मिळालं. या प्रकरणावरुन नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये या प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. पोपटाचा धंदा माझा नाही, देवेंद्र फडणविसांचा पोपट चिठ्ठ्या काढतो आणि ते भविष्यवाणी करतात, ज्यांचा धंदा आहे ते पोपट होऊ शकतात, नवाब मलिक पोपट होऊ शकत नाही; असं म्हणत नवाब मलिक यांनी नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला आहे.
नवाब मलिक पुढे बोलताना म्हणाले की, "100 पेक्षा जास्त लोकांना 26 फर्जी केसेसमध्ये एनसीबीनं अडकवलं आहे, हे अधिकारी भ्रष्टाचार करून लोकांना अडकवत असतील आणि हजारो कोटींची खंडणी वसूल करत असतील तर माझं काम आहे, त्यांना थांबवणं, आणि मी ते कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत नेईल." पुढे बोलताना ते म्हणाले की, "अनुराग कश्यप यांनी मला त्रास झाला असं सांगितलं, जे एनसीबीचे अधिकारी लोकांना धमकी देत होते, ते आज अटकेच्या भीतीत आहे, अनुराग कश्यपसारखे शेकडो लोक अडकले आहेत, व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर सिंह यांना विनंती आहे की निपक्षपणे कारवाई करावी आणि समीर वानखडेची चौकशी करावी."
नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे नामक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई दरम्यान, दोन, चार, पाच ग्राम ड्रग जप्त केलं आहे, एक वर्षांपासून केस दाखल करून झाली, पण त्यात कारवाई झाली नाही. 30 बॉलिवूडकरांना बोलवण्यात आलं, एकालाही अटक नाही, म्हणजे, खंडणीसाठी त्याचा वापर होतो, याची चौकशी झाली पाहिजे." तसेच व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर यांना लेखी पत्र देऊन समीर वानखेडे प्रकरणात चौकशी करण्यासाठी तक्रार करणार असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
"कुठले वैयक्तिक आरोप करण्यात आलेले नाही. त्यांनी शेड्युल कास्ट दाखवून त्याचा फायदा घेतलेला आहे, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न लावलेलं आहे. शिक्षण मुस्लिम म्हणून झालंय आणि त्यांच्या जन्माचा दाखल्यावर तरीही नाव समीर वानखेडे असं आहे. लग्नाच्या दाखल्यात आणि जन्माच्या दाखल्यात समीर दाऊद वानखेडे असा नावाचा उल्लेख आहे.", असंही नवाब मलिक म्हणाले. तसेच, महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की, ज्यांत मुस्लिम व्यक्तीनं धर्मांतर केलं असेल तर त्याला शेड्युलकास्टचा लाभ घेता येत नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, असं नवाब मलिक म्हणाले.