उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंचं नागपुरात जंगी स्वागत, काँग्रेसचे नेते मात्र अनुपस्थित
लोकसभा निवडणुकीत नाना पटोले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. मला अशी आव्हाने पेलण्याची सवय आहे. आव्हानांचा सामना करतच मी इथपर्यंत पोहोचले आहे. मला नागपुरात मोठं आव्हान असल्याचं मी मानत नाही, असं ही पटोले यांनी स्पष्ट केलं.
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (13 मार्च) काँग्रेसने जारी केली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या खासदारीकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या नाना पटोले यांनाही काँग्रेसने नागपूरमधून उमेदवारी दिली आहे.
नागपुरातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाना पटोले दिल्लीहून रेल्वेद्वारे नागपूरात दाखल झाले. रेल्वे स्थानकावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित असताना मात्र नागपुरातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते यावेळी अनुपस्थित होते. विलास मुत्तेमवार, नितीन राऊत अनीस अहमद हे नागपूर काँग्रेसमधील प्रमुख नेते नाना पटोले यांच्या स्वागतावेळी अनुपस्थित होते.
नागपूर काँग्रेसमध्ये गटबाजी नाही
नागपूर काँग्रेसमध्ये गटबाजी नाही. मात्र विरोधकांनी काँग्रेसची गटबाजी दाखवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. प्रकाश आंबेडकर हे माझ्यासाठी आदरणीय आहे. ते मला डमी उमेदवार म्हणत आहेत, तो त्यांचा प्रश्न आहे. नागपुरात कोण डमी उमेदवार आहे? हे येत्या काळात स्पष्ट होईल, असं पटोले यांनी म्हटलं.
नाना पटोले यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी नागपुरातील अनेक अनुसूचित जातीमधील काही बुद्धीवंत, कार्यकर्ते आणि संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ई-मेलद्वारे केली होती. खैरलांजी हत्याकांडानंतर नाना पटोले यांनी घेतलेली पक्षपाती आणि जातीय भूमिका, तसेच आरोपींच्या बचावासाठी केलेले प्रयत्न, आम्ही विसरु शकत नाही. त्यामुळे त्यांची नागपुरातील उमेदवारी या समाजाला दुखावणारी ठरेल, असा दावा त्यांनी ई-मेलमध्ये केला होता. नाना पटोलेंच्या विरोधामागे काँग्रेसचं अंतर्गत राजकारण असल्याचंही बोललं जात होतं.
गडकरी माझ्यासाठी आदरणीय
नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून काय झालं, आशीर्वाद संपत नाही, असं गडकरींनी काल म्हटलं होतं. त्याविषयी बोलताना. गडकरी माझ्यासाठी आदरणीय आहेत. मोठ्यांचा आशीर्वाद नेहमीच लहानासोबत असतोच. याबद्दल नाना पटोलेंनी नितीन गडकरींचे आभारही मानले.
लोकसभा निवडणुकीत नाना पटोले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. मला अशी आव्हाने पेलण्याची सवय आहे. आव्हानांचा सामना करतच मी इथपर्यंत पोहोचले आहे. मला नागपुरात मोठं आव्हान असल्याचं मी मानत नाही, असं ही पटोले यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या
नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही : नितीन गडकरी
नागपूरमध्ये काँग्रेसची डोकेदुखी वाढली, नाना पटोलेंना उमेदवारी न देण्याची मागणी
पक्षानं सांगितलं तर गडकरींविरोधात निवडणूक लढणार – नाना पटोले