Babasaheb Patil on Farmers: आधी म्हणाले लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, टीकेचा आगडोंब उसळताच सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची सपशेल शरणागती, म्हणाले...
Babasaheb Patil on Farmers: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला असताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य केले आहे.

Babasaheb Patil on Loan Waiver: राज्याचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बळीजाराजाविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याच्या सुरु केलेल्या 'उज्ज्वल' परंपरेत राज्याचे विद्यमान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी 'अमूल्य' भर टाकली आहे. राज्यातील लोकांना कर्जमाफीचा (Loan Waiver) नाद लागला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात राजकारणीदेखील काहीही आश्वासनं देऊ टाकतात, असे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी जळगावामधील एका कार्यक्रमात केले. यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधत तातडीने आपल्या वक्तव्याविषयी सपशेल दिलगिरी व्यक्त केली. माझे कर्जमाफीविषयीचे वक्तव्य दूध उत्पादनासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाला अनुसरुन होते, असे स्पष्टीकरण बाबासाहेब पाटील यांनी दिले.
काल मी जळगाव जिल्ह्यातील चोपडा याठिकाणी बँकेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात गेलो होतो. ग्रामीण भागात आपल्याला अर्थव्यवस्था बळकट करायची असेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवायची असेल तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळसारखी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे दर दहा दिवसाला पैसे येतात. त्यामुळे प्रपंचाला पैसे कमी पडत नाहीत. मग अर्बन बँक, पतसंस्था काहीही असोत. माझीदेखील बँक आहे. आम्हीदेखील दूधाच्या व्यवसायासाठी पैसे देतो. या पंतसंस्थेतून जे कर्ज दिले जात आहे, त्याला कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळू शकत नाही, असे मी म्हटले. मीदेखील शेतकरी आहे. त्यामुळे माझ्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. विरोधकांकडून कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जे राजकारण केले जाते, त्याला उद्देशून मी 'कर्जमाफीचा नाद लागला आहे', असे वक्तव्य केल्याचे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
दूधासाठी देण्यात येणारे कर्ज हे कर्जमाफीच्या निकषात बसत नाही, एवढंच मी बोललो होता. त्यामुळे आता जनतेला ठरवावे लागेल, लोकप्रतिनिधींकडे काय मागायचे. एका मतदारसंघातील जनतेने निवडणुकीच्या काळात आमच्या गावात गंगा मिळवून द्या, अशी मागणी केली. तेव्हा तिथे गेलेल्या माणसाने हो गंगा मिळवून देतो, असे सांगितले. सरकारने जाहीरनाम्या दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, माझ्या वक्तव्याने कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. माझे वक्तव्य असंवेदनशील नव्हते तर ते त्या प्रसंगाला अनुसरुन होते, असे बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
Babasaheb Patil on Farmers: बाबासाहेब पाटील नेमकं काय म्हणाले?
लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं आहे, तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासन देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे आपल्याला काय मागायचंय. एखाद्या गावात निवडणुकीच्या काळात अनिल भाईदाससारखा माणूस गेला , लोकांनी सांगितलं आमच्या गावात नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार. त्याने काय मागावं ठरवावं ना.. अनिल भाईदास म्हणाले, नदीही देऊन टाकू.. म्हणून म्हणतो मागणाऱ्यांनी काय मागावं हे ठरवावं..निवडणुकी आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्हीही देखील आश्वासने देतो. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला हवा.
आणखी वाचा
























