एक्स्प्लोर
भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत जनतेने गडकरी-फडणवीसांंचं पार्सल परत पाठवलं, नाना पटोलेंचा पलटवार
भंडाऱ्याचा पार्सल मी नाही. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत गडकरी, फडणवीस यांची पार्सल तिथल्या जनतेने परत पाठवली. गडकरींचं पार्सल पुढे इंदूरला जाईल. त्यामुळे पार्सल कोण हे जनता ठरवतं, अशा शेलक्या शब्दात पटोलेंनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं
नागपूर : नितीन गडकरींनी निवडणूक हरल्यानंतर इतरत्र कुठे ही जाऊ नये, त्यांनी नागपुरातच राहावे. ते राज्यसभेवर जाण्यासाठीच ठीक आहेत, वाटल्यास आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू, असा टोला नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी लगावला. नाना पटोले यांनी आज महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत शहरात बाईक रॅली काढली.
गडकरी नेहमी दावा करतात की त्यांचा मेंदू 200 कोटींचा आहे. त्यामुळे त्यांनी नागपुरातच राहून त्यांचा 200 कोटींचा मेंदू नागपूरच्या विकासासाठी वापरावा. ते राज्यसभेवर जाण्यासाठीच ठीक आहेत, वाटल्यास आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवू, असं पटोले म्हणाले.
भंडाऱ्याचा पार्सल मी नाही. भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत गडकरी, फडणवीस यांची पार्सल तिथल्या जनतेने परत पाठवली. गडकरींचं पार्सल पुढे इंदूरला जाईल. त्यामुळे पार्सल कोण हे जनता ठरवतं, अशा शेलक्या शब्दात पटोलेंनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं. काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंवर तोंडसुख घेतलं होतं.
फडणवीस इथले महापौर होते. आज मुख्यमंत्री आहेत. जर तुम्ही विकास पुरुष असता, तर नागपूरची 60 टक्के जनता घाण पाणी पिण्यास मजबूर झाली नसती. मुख्यमंत्र्यांनी आधी आपली स्थिती पहावी, असा सल्लाही नाना पटोलेंनी दिला.
नागपूरकरांनी गडकरींच्या विकासाला नाकारले आहे. सिमेंट रस्त्यांनी नागपूरचे पर्यावरण बिघडवले. सिमेंट मागे काय लपलं आहे, हे जनतेला माहीत आहे. संपत्तीच्या स्वरुपात विकास किती आणि कोणाचा झाला हे नागपूरकरांना माहीत आहे, असंही पटोले म्हणाले.
नागपुरात भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे नाना पटोले रिंगणात उतरले आहेत. पटोले हे 2014 मध्ये भाजपच्या तिकीटावर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपवर टीकास्त्र सोडत खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement