Nagpur Police : नागपूर पोलिसांची दोन अनोखी शतकं; तीन वर्षांत 200 कुख्यात गुन्हेगारांवर मकोका, तर 150 गुंडावर MPDA अन्वये कारवाई
Nagpur Police : क्राईम कॅपिटल अशी नकारात्मक ओळख झालेल्या नागपुरात गेल्या काही वर्षात गुन्हे तुलनात्मकदृष्ट्या कमी झाले आहे.
नागपूर : क्राईम कॅपिटल अशी नकारात्मक ओळख झालेल्या नागपुरात (Nagpur) गेल्या काही वर्षात गुन्हे तुलनात्मकदृष्ट्या कमी झाले आहे. त्यामागचे एक प्रमुख कारण ठरले आहे, मोठ्या प्रमाणावर गुंड आणि त्यांच्या टोळ्यांविरोधात पोलिसांनी केलेली कठोर कारवाई. नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अनोखा विक्रम करत गुन्हेगारांच्या विरोधातील कारवाई संदर्भात दोन आगळीवेगळी शतके लगावली आहेत.
116 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
गेल्या तीन वर्षात त्यांनी 200 पेक्षा जास्त सराईत गुंडांविरोधात मकोका कायद्यान्वये (MCOCA) कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठवले आहे. तर 150 गुन्हेगारांविरोधात एमपीडीए अन्वये (MPDA) कारवाई केली आहे. याच कालावधीत नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) तब्बल 116 कोटी रुपयांचा नागपूरकरांचा चोरी गेलेला मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त करुन नागरिकांना परतही केला आहे. नागपुरातील पाचपावलीतील सराफा दुकानातील पाच कोटींचा मुद्देमाल 15 दिवसात तपास करुन आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना परत केला आहे. नागरिकांचा चोरी झालेला मुद्देमाल जप्त करुन पुन्हा तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी आम्ही बरेच प्रोग्रॅम आयोजित करत असतो. पुढील 5-10 दिवस दोन तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करणार आहे.लोकांचा पोलिसांवरील विश्वास कायम राहावा यासाठी आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे क्राईम कॅपिटल नागपुरात सध्या पोलिसांचा एक आगळावेगळा वचक दिसून येत आहे.
'शहरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करु'
नागपूर हे महाराष्ट्रातील मोठं, संवेदनशील आणि महत्त्वाचं शहर आहे. नागपुरातील गुन्हेगारीवर टीका होत असते. आता पोलिसांना स्टेक होल्डर, नागरिक, पत्रकार यांचं सहकार्य मिळाल्याने परिस्थिती चांगली दिसत आहे. आव्हानं अजून कायम आहेत, जबाबदारी वाढली आहे. योग्यरितीने अशीच कारवाई कायम ठेवू. शहरातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आमचं मनोधैर्य वाढवणारं आहे. पोलीस दलाचे कर्मचारी शहरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
...तरीही हत्यांच्या घटनांवर पूर्णपणे लगाम नाही
दरम्यान, नागपुरात हत्यांच्या घटनावर पूर्णपणे लगाम लागलेला नाही. मागील 20 वर्षात दरवर्षी 100 हत्यांच्या घटना घडत होत्या. MCOCA आणि MPDA कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईमुळे या घटनांमध्ये मागील वर्षात 35 टक्क्यांची घट झाली आहे. तर यंदा आठ महिन्यांच्या आकडेवारीनुसार 7-8 टक्क्यांनी हत्याच्या घटना वाढल्या आहेत. यातील बरीचशी प्रकरणं ही घरगुती किंवा कौटुंबिक कारणामुळे घडल्या आहेत, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. अल्पवयीन गुन्हेगारांची समस्या ही वाढली आहे. त्यावर स्लम पोलिसिंग हे प्राधान्य राहणार आहे. त्यांना सुधारण्याच्या दृष्टीने काय करता येईल त्याच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. तसेच शहरात अमली पदार्थांचा वापरही वाढताना दिसतो आहे. मात्र त्याचवेळी गुंड आणि त्यांच्या टोळ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करताना दिसत आहेत.
VIDEO : Nagpur Crime Rate Drops : तीन वर्षात 350 गुंडांवर कारवाई, नागपूरचा क्राईम रेट कसा घसरला?